अ‍ॅपशहर

प्रचारावर होऊ द्या खर्च

गेल्या पाच वर्षं विविध कारणांनी झालेल्या गोंधळाने चर्चेत राहिलेल्या चित्रपट महामंडळाची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक भलतीच प्रतिष्ठेची झाली आहे. महामंडळावर ताबा मिळवण्यासाठी नऊ पॅनेल एकमेकांसमोर उभी ठाकली असून, विविध माध्यमांचा वापर करून जोरात प्रचार केला जात आहे.

Maharashtra Times 20 Apr 2016, 3:00 am
चित्रपट महामंडळाची सर्वाधिक खर्चिक निवडणूक; सोशल मीडियासह विविध माध्यमांचा वापर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chitrpat mahamandal nivadanuk
प्रचारावर होऊ द्या खर्च

म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या पाच वर्षं विविध कारणांनी झालेल्या गोंधळाने चर्चेत राहिलेल्या चित्रपट महामंडळाची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक भलतीच प्रतिष्ठेची झाली आहे. महामंडळावर ताबा मिळवण्यासाठी नऊ पॅनेल एकमेकांसमोर उभी ठाकली असून, विविध माध्यमांचा वापर करून जोरात प्रचार केला जात आहे. प्रचाराच्या दृष्टीने ही निवडणूक सर्वांत खर्चिक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
चित्रपट महामंडळात गेल्या पाच वर्षांत तीन वेळा अध्यक्ष बदल झाले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्याचा परिणाम पंचवार्षिक निवडणुकीत दिसून येत आहे. निर्माता, माजी अध्यक्ष विजय कोंडके यांचे ‘कोंडके पॅनेल’, माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांचे ‘शक्ती पॅनेल’, विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर यांचे ‘क्रियाशील’, मेघराज भोसले यांचे ‘पतंग’, मोहन पिंपळे यांचे ‘दादासाहेब फाळके’, दीपक कदम यांचे ‘परिवर्तन’, लक्ष्मीकांत खाबिया यांचे ‘संघर्ष’, विजय सावंत यांचे ‘माय मराठी’, रणजित मिणचेकर यांचे ‘राजर्षी शाहू सिने’ अशा ९ पॅनेलमध्ये खरी लढत आहे. मागच्या निवडणुकीत एकत्र लढलेल्या पॅनेलमध्ये फाटाफूट झाल्याने पॅनेलची संख्या वाढली. महामंडळाच्या इतिहासात प्रथमच ९ पॅनेल निवडणूक लढत आहेत.
चित्रपट महामंडळ ही मराठी चित्रपटसृष्टीची शिखर संस्था असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. राजकीय पक्षांनीही या निवडणुकीत अप्रत्यक्षरित्या रस दाखवला आहे. त्यामुळे महामंडळावर ताबा मिळवण्यासाठी सर्वांमध्येच चुरस आहे. त्यासाठीच जोरदार प्रचार केला जात आहे. सोशल मीडियात पेज तयार करण्यात आली आहेत, व्हॉट्स अॅप मेसेज आणि रेकॉर्डेड फोन केले जात आहेत. त्याशिवाय राज्यभरातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी संपर्क दौऱ्यांचेही नियोजन आहे. महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या व्यापक पद्धतीने प्रचार केला जात आहे. त्यामुळेच ही निवडणूक सर्वांत खर्चिक ठरणार असल्याची माहिती निवडणुकीशी संबंधित सूत्रांनी ‘मटा’ला दिली.
सेलिब्रेटी उमेदवार
महामंडळाच्या निवडणुकीत सेलिब्रेटींनीही रस घेतला आहे. निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह १२ अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. वर्षा ऊसगावकर, निवेदिता सराफ, दीपाली सय्यद, सुशांत शेलार, मिलिंद गवळी, गजेंद्र अहिरे, संजय पवार, अर्चना नेवरेकर यांच्यासारखे टीव्ही मालिका-चित्रपटांतील प्रसिद्ध चेहरेही निवडणूक लढवत असल्यानं या निवडणुकीला विशेष वलय लाभले आहे. २४ एप्रिलला राज्यभरातील चार हजार मतदार त्यांचा कौल देणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज