अ‍ॅपशहर

विनोदी अभिनेत्याचे गंभीर काम दुर्लक्षितच

‘तुम्ही गंभीर भूमिका कधी साकारणार, असे विनोदी नटांना नेहमी विचारले जाते. मात्र तुम्ही विनोदी काम कधी करणार, असे गंभीर भूमिका करणाऱ्यांना कधीही विचारले जात नाही. विनोदी नटाने गंभीर काम केलेच तर, ते गांभीर्याने घेतले जात नाही,’ असे टीकास्त्र प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गुरुवारी सोडले.

Maharashtra Times 23 Jun 2017, 4:14 am
मकरंद अनासपुरे यांची खंत; चित्रपट महोत्सवाचे उद् घाटन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम comedy artists serious work neglected
विनोदी अभिनेत्याचे गंभीर काम दुर्लक्षितच


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘तुम्ही गंभीर भूमिका कधी साकारणार, असे विनोदी नटांना नेहमी विचारले जाते. मात्र तुम्ही विनोदी काम कधी करणार, असे गंभीर भूमिका करणाऱ्यांना कधीही विचारले जात नाही. विनोदी नटाने गंभीर काम केलेच तर, ते गांभीर्याने घेतले जात नाही,’ असे टीकास्त्र प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी गुरुवारी सोडले.
ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार यांच्या नव्वदीनिमित्त द.मा. मिरासदार प्रतिष्ठान, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्यातर्फे आयोजित मराठी विनोदी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन अनासपुरे यांच्या हस्ते झाले. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, उद्योजक कृष्णकुमार गोयल, मिरासदार यांच्या कन्या सुनेत्रा मंकणी, जावई आणि अभिनेते रवींद्र मंकणी, संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, आशयचे वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार आदी या वेळी उपस्थित होते.
‘विनोद हे औषध आहे. विनोद अवघड आहे म्हणून हसण्याचे क्लब स्थापन झाले आहेत. रडण्याचे क्लब नाहीत,’ याकडे लक्ष वेधून अनासपुरे म्हणाले, की विनोदी कलावंत हसवून समाजसेवा करतात. दुसऱ्याचे कारुण्य समजणाराच उत्तम विनोद करू शकतो. विनोद करताना कुणाला त्रास होऊ नये तसे,च कोणी दुखावणार नाही, याची काळजी घेतली जाते. ‘विनोद हे भाष्य आहे. कलाकार तीव्रपणे विनोदातून काही सांगत असतो. पूर्वी दादा कोंडकेंच्या द्विअर्थी विनोदाचेही समाजाला वावडे नव्हते. सभ्य लोकही त्या विनोदाचा आनंद घेत असत. पण, मधील काळात पोरकट विनोदी चित्रपट निर्माण झाले. त्यामुळे प्रेक्षक दूर गेला,’ यावर कुलकर्णी यांनी बोट ठेवले. मराठी चित्रपट म्हणजे मारुतीच्या बेंबीत बोट घालून गार वाटून घेण्यासारखे आहे, कारण पैसाच मिळत नाही, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनाच्या आधी ’ब्रह्मचारी’ तर उत्तरार्धात ‘काय द्याच बोला’ हे चित्रपट दाखविण्यात आले.

पुणेरी किश्शातून पुणेकरांची फिरकी
चित्रपट संग्रहालयात आलेल्या चोखंदळ चित्रपट रसिकांसमोर मकरंद अनासपुरे यांनी पुणेरीपणाचा किस्सा सांगून पुणेकरांचीच फिरकी घेतली. ‘आशय’र्फे ‘सातच्या आत घरात’ हा चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटात माझ्या वडिलांची भूमिका निळू फुलेंनी केली आहे. चित्रपट संपल्यानंतर एका पुणेरी चित्रपट रसिकाने दिग्दर्शक संजय सूरकर यांना हटकले की, मुलगा मराठवाडी भाषा बोलतो आणि त्याचे वडील मात्र पश्चिम महाराष्ट्रातील भाषा बोलतात. हे तुम्ही जाणीवपूर्वक केले आहे का, या पुणेरी सवालाने सूरकर भांबावून गेले. तेव्हापासून मी आशय आणि येथील रसिकांचा धसका घेतला आहे,’ असे अनासपुरे यांनी सांगताच टाळ्यांची बरसात झाली. ‘चंद्रकांत कुलकर्णी यांनी काय द्याच बोला चित्रपटातून मला हिरो केले. आता मी खातापित्या घरचा वाटतो. तेव्हा मी केवळ ‘पित्या’ घरचा वाटायचो,’ अशी कोटी अनासपुरे यांनी आपल्या शैलीत करून धमाल उडवून दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज