अ‍ॅपशहर

मुलीच्या वाढदिवसाला ‘व्हिडिओ कॉल’चा दिलासा

लॉकडाउनच्या काळात सगळेजण घरी एकमेकांसोबत मजेत वेळ घालवत असले, तरी सर्वांनाच हे सुख प्राप्त होते असे नाही. एकमेकांपासून विभक्त झालेल्या पती-पत्नीच्या एकुलत्या एका मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आईला तिची भेट घेता येणे शक्य नसल्याने अखेर तिच्याशी 'व्हिडिओ कॉल'द्वारे संपर्क साधून तिचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी फॅमिली कोर्टाने दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स 13 Apr 2020, 6:42 am
Vandana.Ghodekar@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम birthday


Tweet : @VandanaaMT

लॉकडाउनच्या काळात सगळेजण घरी एकमेकांसोबत मजेत वेळ घालवत असले, तरी सर्वांनाच हे सुख प्राप्त होते असे नाही. एकमेकांपासून विभक्त झालेल्या पती-पत्नीच्या एकुलत्या एका मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आईला तिची भेट घेता येणे शक्य नसल्याने अखेर तिच्याशी 'व्हिडिओ कॉल'द्वारे संपर्क साधून तिचा वाढदिवस साजरा करण्याची परवानगी फॅमिली कोर्टाने दिली आहे.

त्या दोघांचे भांडण झाल्यामुळे मुलीचा ताबा वडिलांकडे देण्यात आला आहे. आईला अधूनमधून तिला भेटण्याची परवानगी आहे. 'लॉकडाउन'च्या काळात तिचा वाढदिवस आला. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी मुलीला भेटणे शक्य नव्हते; म्हणून तिच्या आईने कोर्टात अर्ज दाखल करून मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी परवानगी मागितली. कोर्टाने आईला मुलीकडे व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्याची परवानगी दिली. फॅमिली कोर्टाने नुकताच हा आदेश दिला आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सध्या लॉकडाउन सुरू आहे. हे लॉकडाउन आता ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांचा ताबा मिळावा म्हणून कोर्टात दावा दाखल होणाऱ्या दाव्यांचे प्रमाण वाढलेले असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे पालकांना आपल्या मुलांना भेटता येऊ शकत नाही. लॉकडाउनच्या काळातच मुलीचा वाढदिवस आल्यामुळे तिला शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉल करण्यास परवानगी मिळावी म्हणून संबंधित आईने फॅमिली कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दावा दाखल केला होता. कोर्टाने तिला व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून मुलीला शुभेच्छा देण्याची परवानगी दिली.

'ज्या पालकांकडे मुलांचा ताबा आहे. ते पालक आपल्या मुलांना त्याच्या इतर पालकांशी बोलू देत नाही. आई किंवा वडिलांविषयी मुलांचे मन कलुषित करण्याचा प्रकार संबंधित पालकांकडून घडतो. फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क केल्यास त्यांच्याकडून हा प्रयत्न केला जाऊ शकतो. लॉकडाउनच्या काळात व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून फॅमिली कोर्टात दावे दाखल होऊ लागले आहेत, अशी माहिती दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज