खडकवासला
---
म. टा. प्रतिनिधी, पुणे
खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांचे बंड शमले असून, त्यांच्या माघारीमुळे भाजपचे विद्यमान आमदार भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार नगरसेवक सचिन दोडके यांच्यात थेट लढत होणार असल्याचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वांत कमी म्हणजे अवघे सात उमेदवार या मतदारसंघात असल्याने तापकीर विरुद्ध दोडके अशी चुरस असणार आहे.
कोंडे यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघात रंगत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, कोंडे यांनी माघार घेतली. तसेच बाळू प्रताप या अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने अवघे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. तापकीर आणि दोडके यांच्याशिवाय 'वंचित बहुजन आघाडी'चे अप्पा आखाडे, 'बहुजन समाज पार्टी'चे अरुण गायकवाड, 'बहुजन मुक्ती पार्टी'चे राहुल बगाडे, दीपक बलाढे आणि बाळासाहेब अर्जुन पोळ हे अपक्ष उमेदवार असणार आहेत. कोंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे या मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता होती. मात्र, कोंडे यांचे बंड शमले असून, त्यांनी दुपारी अर्ज मागे घेतला.
...........
यांच्यात होणार लढत
महायुती : भीमराव तापकीर (भाजप)
आघाडी : सचिन दोडके (राष्ट्रवादी काँग्रेस)
वंचित बहुजन आघाडी : अप्पा आखाडे
बहुजन समाज पार्टी : अरुण गायकवाड