अ‍ॅपशहर

करोना प्रश्नोत्तरे-१२

रक्तदान करणारी व्यक्ती 'करोना' पॉझिटिव्ह असेल, तर ज्याला ते रक्त दिले जाईल, त्याला तो होईल का?उत्तर : 'करोना' आजाराचा प्रसार श्वासामार्फत होतो...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2020, 4:00 am

'करोना' रक्तातून पसरत नाही

प्रश्न : रक्तदान करणारी व्यक्ती 'करोना' पॉझिटिव्ह असेल, तर ज्याला ते रक्त दिले जाईल, त्याला तो होईल का?

उत्तर : 'करोना' आजाराचा प्रसार श्वासामार्फत होतो. रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणारे तुषार श्वासातून शरीरात प्रवेश करतात किंवा वस्तूंवर पडलेल्या तुषारांना हस्तस्पर्श झाल्यावर, तोच हात नाका-तोंडाला किंवा चेहऱ्याला लागल्यावर श्वासातून शरीरात जाऊन होतो. तो रक्तातून पसरत नाही. एचआयव्ही, हिपॅटायटीस-बी हे आजार रक्तातून पसरतात.

प्रश्न : 'पीपीई' म्हणजे काय? त्यात काय काय येते?

उत्तर : रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स यांना रुग्णांच्या जवळ जाऊन तपासावे लागते, औषधे द्यावी लागतात. हे रुग्ण सतत खोकत असतात. त्यांच्या अंगावरील कपड्यांवर, त्यांच्या खाटेवर आणि आजूबाजूच्या वस्तूंवर विषाणू पसरलेले असतात. अशावेळी रुग्णाच्या शरीरातील विषाणू डॉक्टर्स आणि नर्सच्या शरीरात जाऊन त्यांना त्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी काही वैयक्तिक संरक्षक साधने वापरली जातात. यामध्ये एन-९५ मास्क, डोक्यावरील टोपी, डोळ्यांवर गॉगल्स, अंगातील गाउन, पादत्राणे अशा गोष्टी डॉक्टरांना वापराव्या लागतात. यांनाच पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किंवा पीपीई म्हणतात.

प्रश्न : माझी पत्नी कामानिमित्त रोज बँकेत जाते. तिने कामावर जाताना आणि येतानाच्या प्रवासात कोणती काळजी घ्यावी?

उत्तर : जाताना मास्क वापरावा. शक्यतो वैयक्तिक वाहनाने प्रवास करावा. बसने गेल्यास इतर प्रवाशांपासून तीन फूट अंतर ठेवावे. ऑफिसमध्ये गेल्यावर हात साबणाने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत. कामादरम्यान चेहऱ्याला, नाका-तोंडाला हात लावू नये. जेवणापूर्वी पुन्हा हात धुवावेत. घरी गेल्यावर कपडे बदलावेत. पुनश्च हात धुवून घरातील कामे करावीत.

प्रश्न : 'करोना'चा रुग्ण कसा ओळखावा?

उत्तर : निदान केल्याशिवाय 'करोना'च्या रुग्णाची खात्री होऊ शकत नाही. गेल्या २८ दिवसांत परदेशी प्रवास केलेला असल्यास किंवा असा प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या निकट सहवासात आलेल्या व्यक्तींना सर्दी, घसा दुखणे, कडक ताप आणि कमालीचा खोकला येऊन दम लागत असेल, तर तो 'करोना'चा रुग्ण असतो. ही खात्री करून घेण्यासाठी डॉक्टरांना दाखवून घ्यावे. आपल्याला 'करोना'ची बाधा झाली आहे म्हणून दुःखी बनून बसू नये.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज