अ‍ॅपशहर

जनताच होणार ‘निर्माती’

ओंकार ढोरे या तरुणाने लोकवर्गणीतून चित्रपट निर्मिती करण्याचा विडा उचलला आहे.

आदित्य तानवडे | Maharashtra Times 15 May 2017, 3:00 am
पुणे : चित्रपटाला निर्माताच नाही, असा विचारही कोणी करू शकत नाही. पण महाराष्ट्राची जनताच निर्माती झाली तर…? ही संकल्पना जरी थोडी विचित्र वाटत असली तरी तळेगावच्या ओंकार ढोरे या तरुणाने ती प्रत्यक्षात आणण्याचा विडा उचलला आहे. लोकवर्गणीतून हा २१ वर्षीय तरुण ‘तालुका शांघाय’ नावाचा चित्रपट तयार करणार असून त्यासाठी तो महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम director omkar dhore make film with peoples participation
जनताच होणार ‘निर्माती’


वर्षभर राज्यभर फिरून स्वेच्छेने लोकांकडून मिळालेल्या देणगीतून ओंकार हा चित्रपट साकारणार आहे. चित्रपटासाठी पैसे देणाऱ्या प्रत्येकाला तो निर्मात्याचा दर्जा देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात १० लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या उपक्रमामार्फत केला जाणार आहे. सफाई कर्मचारी, भाजीवाले, फेरीवाले यांच्यापासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांकडून त्यांना जमेल ती रक्कम घेतली जाणार आहे. एवढे करून ओंकार थांबणार नाही. त्याने ‘पीपल सिनेमा’ या नावाने एक वेबसाइट सुरू केली असून एका मोबाइल अँड्रॉइड अॅपला ती जोडली आहे. त्याद्वारे प्रत्येक पैसे देणाऱ्या नागरिकाला ओंकारकडे किती पैसे जमा झाले, हे कळू शकणार आहे. शिवाय प्रत्येक महिन्याला पैसे देणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ओंकार स्वतः एसएमएसद्वारे माहिती देणार आहे. पीपल सिनेमाच्या नावाखाली दुसऱ्या कोणी पैशांची मागणी करू नये, यासाठी ओंकारने खबरदारी घेतली आहे. लोकांचा या उपक्रमावर विश्वास बसावा, या उद्देशाने त्याने दोन लाख रुपये खर्च करून चित्रपटाचा टीजर तयार केला आहे. त्याद्वारे लोकांकडून जमेल त्या स्वरूपात निधी जमा करण्याचा त्याचा मानस आहे.

ओंकारने सुजय डहाके यांच्या ‘फुंतरू’ या सिनेमासाठी स्क्रिप्ट सुपरवायजर म्हणून काम पाहिले. ‘बार्डो’ या आगामी मराठी चित्रपटातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर ओंकारने तामिळनाडूचा रस्ता धरला. तिथे त्याने एका रशियन चित्रपटासाठी सहलेखक आणि सहदिग्दर्शकाची जबाबदारी सांभाळली. तिथे त्याला सर जॉन अब्राहम या दिग्दर्शकाविषयी माहिती मिळाली. त्यांनी १९८०च्या दशकात केरळमध्ये फिरून लोकवर्गणी गोळा करून मल्याळी भाषेत एक चित्रपट तयार केला होता. त्या काळी त्यांनी १५ लाख रुपये जमवले होते. सर जॉन अब्राहम हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन ओंकारनेही लोकवर्गणीतून ‘तालुका शांघाय’ हा चित्रपट तयार करण्याचा घाट घातला आहे.

ग्रामीण भागातले बदलते जीवनमान, गावातील नव्या आणि जुन्या पिढीतील तात्विक संघर्ष या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तळेगाव जवळच मावळ तालुक्यातील काही खेडेगावांची निवड करण्यात येणार आहे. चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सेलिब्रिटी कलाकाराला घेण्याऐवजी मावळ तालुक्यातील ग्रामस्थच या चित्रपटात अभिनय करणार आहेत.

ओंकारसह त्याच्या चार मित्रांनी हा उपक्रम पूर्ण करायचे ठरवले आहे. शिवाय चित्रपटाच्या तांत्रिक बाबी चित्रपटसृष्टीत अत्यंत अनुभवी असणारी मंडळी सांभाळणार आहेत. त्यामध्ये ‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक रोहन-रोहन, ‘सैराट’, ‘फँड्री’, ‘तिथी’ अशा चित्रपटांचे साउंड डिझायनर अविनाश सोनावणे अशा अनुभवी तंत्रज्ञ आणि कलाकारांचा समावेश असणार आहे.
.....
‘पीपल सिनेमा’ ही कल्पना चांगली आहे. परंतु, जी मंडळी पैसे देणार आहेत, त्यांची विश्वासार्हता जपण्यासाठी कायद्याच्या आधारे हा उपक्रम राबवणे गरजेचे आहे. कायद्याच्या चौकटीत हा उपक्रम बसला, तर त्यासाठी चित्रपट महामंडळाकडून त्वरीत परवानगी देण्यात येईल.
- मेघराजराजे भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
.....
चित्रपटासाठी गोळा झालेल्या लोकवर्गणीतील प्रत्येक पैसा चित्रपट निर्मितीसाठी वापरणार आहोत. राज्यभर फिरताना राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही आम्ही स्वतःच्या खिशातून करणार आहोत. हा चित्रपट माझे स्वप्न आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील लाखो लोकांचा सहभाग असेल. त्यांचा चित्रपट म्हणून ते स्वतःहून पाहायला येतील.
- ओंकार ढोरे, दिग्दर्शक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज