अ‍ॅपशहर

कागदपत्रे चोरून नोकरदारांना गंडा

आयटी इंजिनियरच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून बँकांचे क्रेडिट कार्ड काढून गंडा घालणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला सायबर सेलने अटक केली. शेअर बाजारात तोटा झाल्यामुळे पैसे मिळविण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

Maharashtra Times 20 May 2017, 4:26 am
क्रेडिट कार्ड काढणाऱ्या उच्चशिक्षितास अटक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम documents through looted to it engineer
कागदपत्रे चोरून नोकरदारांना गंडा


म. टा. प्रतिनिधी, पुणे

आयटी इंजिनियरच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून बँकांचे क्रेडिट कार्ड काढून गंडा घालणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाला सायबर सेलने अटक केली. शेअर बाजारात तोटा झाल्यामुळे पैसे मिळविण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.
स्मिथ ईमॅन्युअल साळवे (वय २९, रा. डेस्टिनी अपार्टमेंट, स्वराज गार्डन हॉटेलशेजारी, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी ब्रिजेश नंदन या आयटी इंजिनियरने सांगवी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेश मोबाइल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. तुमची क्रेडिट कार्डची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अशा आशयाचा त्यांना एप्रिल महिन्यात ई-मेल आला. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर क्रेडिट कार्डसाठी लागणारी कागदपत्रे तुमच्या पत्त्यावरून बँकेच्या कर्मचाऱ्याने प्राप्त केली आहेत. ही कागदपत्रे तुम्ही दिल्याची खात्री करा, असा दुसरा ई-मेल त्यांना प्राप्त झाला. ब्रिजेश यांनी ही कागदपत्रे दिली नसल्याचे बँकेच्या मेलवर कळवून क्रेडिट कार्डचा अर्ज रद्द करण्याचे सांगितले.
ब्रिजेश यांना एक मे रोजी मोबाइलवर कोटक बँकेडून ‘तुमच्या क्रेडिट कार्डचा अर्ज मिळाला असून, प्रक्रिया १५ दिवसात केली जाईल,’ असा संदेश आला. त्यानंतर ब्रिजेश यांनी कोटक बँकेत जाऊन चौकशी केले. त्यावेळी त्यांच्या नावाने क्रेडिट कार्डसाठी अर्ज केलेला दिसला. त्यामध्ये त्यांच्या नावाची कागदपत्रे वापरली असून, त्यात फोटो दुसऱ्या व्यक्तीचा होता. त्यानंतर त्यांना एसबीआय, एचडीएफसी या बँकांकडेही त्यांच्या नावाने क्रेडिट कार्डसाठी अर्ज केले असल्याचे समजले. त्यांच्या नावाने कुणीतरी दुसरीच व्यक्ती कागदपत्रांचा गैरवापर करून अर्ज करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर सेलकडे तक्रार केली. या गुन्ह्याचा समांतर तपास सायबर गुन्हे शाखा करत होती. सायबर सेलचे पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, पोलिस निरीक्षक राधिका फडके यांच्या पथकाने साळवेला अटक केली. साळवे याने कोटक महिंद्र बँकेच्या क्रेडिट कार्डसाठी केलेल्या अर्जात दुसरा मोबाइल क्रमांक दिला होता. तो क्रमांक साळवेचा असल्याचे आढळून आले. त्यावरून साळवेला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्याने अशा प्रकारे अर्ज करून फसवणूक केल्याचे कबूल केले.

आरोपी निघाला फिर्यादीचा शेजारी
साळवे याने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतलेली आहे. तो ब्रिजेश राहात असलेल्या सोसाटीतच राहण्यास आहे. एके दिवशी त्यांच्या दरवाजासमोर पडलेले पार्सल उचलून नेले. त्यामध्ये असलेल्या कागदपत्रांवर सायबर कॅफेमध्ये जाऊन फेरफार केले. त्यानंतर या कागदपत्रांच्या मदतीने क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला. साळवे हा शेअर बाजारात ट्रेडिंग करतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज