अ‍ॅपशहर

‘बोगस’ डॉक्टरांकडून कुत्र्यांची नसबंदी?

भटक्या कुत्र्यांच्या नसंबदीचे काम करणाऱ्या संस्थांपैकी दोन संस्थामध्ये पशुवैद्यकीय पदवी नसलेल्या दोन बोगस डॉक्टरांकडून नसबंदी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मुस्तफा आतार | Maharashtra Times 30 Jul 2018, 7:18 am
पुणे : भटक्या कुत्र्यांच्या नसंबदीचे काम करणाऱ्या संस्थांपैकी दोन संस्थामध्ये पशुवैद्यकीय पदवी नसलेल्या दोन बोगस डॉक्टरांकडून नसबंदी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भटक्या कुत्र्यांच्या शहरातील वाढत्या संख्येवरून कुत्र्यांची नसबंदी खऱ्या अर्थाने झाली का असा सवाल उपस्थित करण्यात येत असतानाच, संबंधित संस्थेत डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या दोन्ही व्यक्ती 'पशुवैद्यकीय तज्ज्ञ' नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे, या दोन्ही बोगस डॉक्टरांविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश राज्य पशुवैद्यकीय परिषदेने दिले आहेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dogs


पशुवैद्यक नसताना सुद्धा नावापुढे डॉक्टर ही उपाधी लावून बोगस पशुवैद्यकीय व्यवसाय करीत असल्याची तक्रार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे प्राप्त झाली होती. या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश कुणाल कुमार यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिले होते. त्या तक्रारीबाबत महापालिकेने पशुसंवर्धन परिषदेकडे चौकशी केली. त्यावेळी महापालिकेला पाठविलेल्या पत्रात, संबंधित दोन्ही बोगस डॉक्टर राज्य पशुवैद्यकीय परिषदेचे नोंदणीकृत पशुवैद्यक नाहीत; तसेच संबंधितांची परिषदेकडे नोंदणी नसल्याचे कागदपत्रांवरून दिसून येत आहे, असे राज्य पशुवैद्यकीय परिषदेने म्हटले होते. त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांनी देखील चौकशीचा अहवाल परिषदेकडे दिला होता. त्यानंतर, 'संबंधित संस्थेचे ते दोन्ही व्यक्ती डॉक्टर असल्याचे भासवून अनधिकृत पशुवैद्यकीय व्यवसाय केल्याचे व अशासकीय स्वयंसेवी संस्था पुणे महापालिका तसेच सोलापूर येथे चालवित असल्याचे निष्पन्न होते. त्यामुळे १९८४ च्या भारतीय पशुवैद्यकीय कायद्यातील कलम ५६ नुसार डॉक्टर उपाधी लावून अनधिकृत पशुवैद्यकीय व्यवसाय व अशासकीय स्वयंसेवी संस्था चालविणे हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यामुळे कलम ५९ नुसार संबंधितांविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात यावेत', असे आदेश राज्य पशुवैद्यकीय परिषदेने दिले आहेत. तसेच त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवालही देण्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, त्या दोन बोगस डॉक्टरांच्या चौकशीची प्रक्रिया सुरू होताच ते ज्या संस्थांसाठी काम करीत होते त्या संस्था या वर्षी पालिकेच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे.

'कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी चार संस्थांकडे जबाबदारी देण्यात आली होती. त्यामध्ये ब्ल्यू क्रॉस सोसायटी, पिपल फॉर अॅनिमल, सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन टू क्रूएल्टी टू अॅनिमल (नांदेड) तसेच अॅनिमल वेलफेअर असोसिएशन (नवी मुंबई) या संस्थांचा समावेश होता. ३१ मार्चपर्यंत या संस्थांच्या कामाची मुदत होती. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. या संस्थांपैकी पिपल फॉर अॅनिमल आणि सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन टू क्रूएल्टी टू अॅनिमल (नांदेड) या दोन संस्थांनी नसबंदी करण्याचे काम बंद केले आहे. उर्वरित दोन संस्था काम करीत आहेत. एका कुत्र्यामागे ६५५ रुपयांची रक्कम संस्थेला दिली जाते. कुत्र्यांची नसबंदीची प्रक्रिया संस्थेच्या डॉक्टरांकडून होत असून आरोग्य विभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगराणीखाली ते करण्यात येते', असे पालिकेचे पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश वाघ यांनी सांगितले.

दरम्यान, आतापर्यंत महापालिकेकडून कुत्र्यांची नसबंदीचे काम दिले गेलेल्या काही संस्थांना काम करण्याची मान्यता आहे की नाही याची खातरजमा करण्यात आली नव्हती. त्यामुळे काम बंद केलेल्या संस्थांचे ते दोन बोगस डॉक्टरच कुत्र्यांची नसबंदी करीत होते. त्याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले. नसबंदीचे काम दिलेली संस्था ही त्यांचीच संस्था असून त्यांनी महाराष्ट्रात अन्यत्र कुत्र्यांची नसबंदी करण्याबाबतच्या कामाचे टेंडर भरले होते. तक्रारीमुळेच त्या संस्था महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भटक्या कुत्र्यांची नसबंदीची शस्त्रक्रिया बोगस डॉक्टरांकडून करण्यात आल्याच्या तक्रारीत तथ्य आहे. त्याबाबत बोगस डॉक्टरांची चौकशी करण्यात आली आहे. त्या दोघांवर कारवाई होईल. पण कुत्र्यांच्या नसबंदीशी त्यांचा संबंध नाही.

- डॉ. प्रकाश वाघ, पशुवैद्यकीय अधीक्षक

भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीसंदर्भातील कार्यभार आपल्याकडे नुकताच आला आहे. पण त्यांच्याबाबत अधिक माहिती आपल्याकडे सध्या तरी नाही. या प्रकरणाबाबत अधिक चौकशी करू.

- डॉ. अंजली साबणे, सहायक आरोग्य प्रमुख

नसबंदीची प्रक्रिया कशी...

- नसबंदी करण्यात येणाऱ्या कुत्र्यांना विविध भागात जाऊन पकडण्यात येते.

- दुसऱ्या दिवशी नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात येते

- शस्त्रक्रिया झाल्याचे ओळखण्यासाठी कुत्र्यांचे कान कापले जाते

- शस्त्रक्रियेनंतर जखमेला मलम लावले जाते

- अॅन्टी रेबीज लस दिली जाते

- संस्थेकडे असताना कुत्र्यांना चिकन तसेच भात खायला दिले जाते.

- त्यानंतर ज्या भागातून कुत्रे पकडण्यात आले तेथे सोडण्यात येतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज