म. टा. प्रतिनिधी, पुणे
हात उसने घेतलेले पैसे परत देण्यासाठी दिलेला धनादेश न वटल्या प्रकरणी एकाला एक महिना सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच धनादेशाच्या रकमेवर सहा टक्के प्रतिवर्षी प्रमाणे व्याजाची रक्कम मिळून चार लाख ६२ हजार देण्याचा आदेश कोर्टाने दिला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. टेकाळे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.
ज्ञानेश्वर अभंग भोसले (वय ३४, रा. जयभवानी नगर, हडपसर) याला शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी गणेश सुभाष चौडकर (३८, रा. हडपसर) यांनी लष्कर न्यायालयात तक्रार दाखल केली होती. भोसले हे फिर्यादी यांचे मेहुणे आहेत. चौडकर यांनी भोसले यांना हात उसने म्हणून तीन लाख रुपये दिले हिते. भोसले यांनी पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश वटला नाही. फिर्यादीनी आरोपीला नोटीस पाठवून ही बाब कळवली होती. तसेच, पैसे देण्याची विनंती केली. मात्र, आरोपीने फिर्यादीला पैसे न दिल्याने त्यांनी आरोपीविरुद्ध न्यायालयामध्ये तक्रार दावा दाखल केला होता. चौडकर यांनी २००९ मध्ये लष्कर न्यायालयात अॅड. के. टी. आरु, अॅड. वीणा गुडी, अॅड. संदीप शेळवणे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता.