अ‍ॅपशहर

आता ‘एकला चलो रे’चा नारा

महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यापासून संभाव्य युतीबाबत चर्चा करूनही निष्कर्ष निघत नसल्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून आता ‘एकला चलो रे’चा मार्गच अवलंबण्यात येण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने कार्यकर्त्यांना अधिक ‘वेटिंग’वर न ठेवता, सर्व जागांची तयारी करा, असे संकेत देण्यात येत आहेत.

Maharashtra Times 23 Jan 2017, 3:00 am
युतीला विलंब होत असल्याने दोन्ही पक्षांकडून उमेदवारांना संदेश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम election in pune no yuti in pune
आता ‘एकला चलो रे’चा नारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे
महापालिकेच्या निवडणुकीसाठी गेल्या आठवड्यापासून संभाव्य युतीबाबत चर्चा करूनही निष्कर्ष निघत नसल्याने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून आता ‘एकला चलो रे’चा मार्गच अवलंबण्यात येण्याची शक्यता आहे. पालिका निवडणुकीसाठी येत्या शुक्रवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार असल्याने कार्यकर्त्यांना अधिक ‘वेटिंग’वर न ठेवता, सर्व जागांची तयारी करा, असे संकेत देण्यात येत आहेत.
राज्यातील भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक पातळीवर युतीसंदर्भात चर्चा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर, गेल्या सोमवारी आणि शनिवारी भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाने युतीबाबत चाचपणी करण्याच्या दृष्टीने प्राथमिक स्तरावर चर्चा केली. या चर्चेमध्ये गेल्या पालिका निवडणुकांमधील जागेप्रमाणेच दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार केला जावा, यावर चर्चा झाली. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये त्यावर एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे, येत्या २-३ दिवसांत पुन्हा बैठक घेतली जाण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईमध्येही युती होण्याबाबत साशंकता कायम असल्याने स्थानिक स्तरावर सर्व जागा लढविण्याचा निर्धार एका बाजूने व्यक्त केला जात आहे. सर्व १६२ जागा लढविण्याची तयारीही दोन्ही पक्षांनी केली असून, युतीचे चित्र अद्याप अस्पष्ट असल्याने कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असा संदेश देण्यात आला आहे. पालिका निवडणुकीसाठी २७ जानेवारीपासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे, कदाचित आठवड्याच्या अखेरपर्यंत पक्षाची पहिली यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार, युती होऊ शकली नाही, तर संभाव्य उमेदवारांची यादी अंतिम करण्याचे कामही दोन्ही पक्षांना तातडीने करावे लागणार आहे. यापूर्वी, विधानसभेची निवडणूक दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढवली असल्याने नेमकी आपली ताकद कुठे आहे, कोणत्या भागांत आपण कमी पडतो, याचा पुरेसा अंदाज आला आहे. तसेच, गेल्या काही दिवसांत भाजपमध्ये विविध पक्षांतून मोठ्या प्रमाणात ‘इन्कमिंग’ झाले असल्याने तेथील पक्षाच्या उणिवा भरून निघतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. म्हणूनच, पालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने ‘एकला चलो रे’चा मंत्रच अंमलात येईल, असे दिसते.
..................
शिवसेना ठाम
महापालिका निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही अनेक विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व पक्षांतरामध्ये केवळ शिवसेना या एकाच पक्षातून एकही विद्यमान किंवा माजी नगरसेवक बाहेर पडलेला नाही. त्यामुळे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘शिवबंधना’वर अजूनही सर्व कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास असून, त्या बळावरच पालिका निवडणुकीत एकट्याने लढण्याचीही तयारी असल्याचा ठाम विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात आहे. भाजपने दिलेल्या तुटपुंज्या जागांवर समाधान मानण्याऐवजी स्वबळावर मतदारांना सामोरे जाण्याची तयारी त्यांनीही सुरू केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज