पुणे : जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली असून, त्यात खेड, जुन्नर, मंचर, नीरा, भोर आणि मावळ बाजार समितीचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी मतदार असलेल्या विकास सोसायट्या आणि ग्रामपंचायतींच्या सदस्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सहकार विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणुकांचा संभाव्य कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रारुप व अंतिम मतदार याद्या या ३० सप्टेंबर २०२१ या अर्हता दिनांकावर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर दहा ऑक्टोबर २०१५ पासून प्रशासक नेमण्यात आला आहे. संबंधित तालुक्यांच्या सहाय्यक निबंधकांकडून विकास सोसायट्यांचे सदस्य आणि गट विकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायत सदस्यांच्या याद्या तयार केल्या जाणार आहेत.