अ‍ॅपशहर

प्रथम वर्ष डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ

राज्यात दहावीनंतरच्या प्रथम वर्ष ऑनलाइन डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेत जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत गोंधळ झाला आहे.

Maharashtra Times 22 Jul 2017, 3:00 am
गुणवत्ता यादी चुकल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम first year diploma online admission process make chaos in maharashtra
प्रथम वर्ष डिप्लोमाच्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ


म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यात दहावीनंतरच्या प्रथम वर्ष ऑनलाइन डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेत जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीत गोंधळ झाला आहे. गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांनी कॉलेजांमध्ये प्रवेश घेतले. मात्र, प्रकाशित केलेली यादी चुकल्याने विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश ऐनवेळी रद्द करावे लागले आहेत. दरम्यान, कक्षाने सुधारित गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आता त्यानुसार दुसऱ्या फेरीसाठी पसंतीक्रम भरले आहेत. मात्र, त्यांना आता पसंतीचे कॉलेज मिळेल का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राज्यातील डिप्लोमा कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणांवर डिप्लोमा कॉलेजांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://dtemaharashtra.gov.in या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्जात ११ जुलैपर्यंत कॉलेजांचे पसंतीक्रम भरले होते. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता १३ जुलै रोजी ऑनलाइन प्रवेश पद्धतीने जाहीर करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी १४ ते १९ जुलै दरम्यान यादीनुसार मिळालेल्या (अॅलोट) झालेल्या कॉलेजांमध्ये शुल्क भरून प्रवेश घेतले. मात्र, ऑनलाइन सिस्टीमधील तांत्रिक चुकांमुळे गुणवत्ता यादीत घोळ झाला. त्यामु‍ळे विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने कॉलेज अॅलोट झाले. त्यामुळे कक्षातर्फे १९ जुलैला सुधारित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

त्यामुळे कॉलेजांनी पहिल्या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश रद्द करायला लावले. या कारणाने विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंध‍ळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांची इच्छा नसताना त्यांना प्रवेश रद्द करावा लागला. आता या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी येत्या २३ जुलैपर्यंत पसंतीक्रम भरायचे असून त्याची गुणवत्ता यादी २४ जुलैला जाहीर करण्यात येईल. मात्र, आता विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजांमध्ये प्रवेश मिळेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार ४७३ डिप्लोमा कॉलेज असून त्यांची एकूण प्रवेशक्षमता एक लाख ५९ हजार एवढी होती.

मॅनेजमेंट कोट्याचे आमिष

प्रवेश प्रक्रियेत गोंधळ झाल्याचे पाहून राज्यातील काही खासगी डिप्लोमा कॉलेजांकडून विद्यार्थ्यांना ‘मॅनेजमेंट’ कोट्यातून प्रवेश घेण्याचे आमिष दाखविण्यात येत आहे. गोंधळामुळे आता विद्यार्थ्यांना इच्छित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच, कॉलेजांमध्ये प्रवेशासाठी जागा शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ‘मॅनेजमेंट’ कोट्यातून डोनेशन भरून प्रवेश घेऊन टाका, असे कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
......
तांत्रिक कारणामुळे पहिल्या गुणवत्ता यादीत घोळ झाला होता. त्यामुळे नव्याने सुधारित गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीसाठी ऑनलाइन अर्जात पसंतीक्रम भरावेत. विद्यार्थ्यांना कॉलेजांमध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे त्यांनी घाबरून जाऊ नये. प्रवेशासाठी ‘मॅनेजमेंट’ कोट्याचे आमिष दाखविणाऱ्या कॉलेजांवर कारवाई करण्यात येईल.
- डॉ. चंद्रशेखर ओक, आयुक्त, राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्ष

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज