अ‍ॅपशहर

... तर पूर्वीप्रमाणे राज्यात कडक लॉकडाऊन; पवारांचा थेट इशारा

संचारबंदीतही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या नागरिकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सज्जड दम दिला असून पुन्हा इशारा दिला आहे. (ajit pawar)

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Apr 2021, 8:29 pm
पुणेः करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीही रुग्ण वाढीचे प्रमाण आटोक्यात येत नसल्याचं चित्र आहे. तसंच, अनेक नागरिकांकडून निर्बंधांचे पालन होत नसल्याचंही समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना कठोर इशारा दिला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit pawar (1)


'करोना संसर्गाच्या या दुसऱ्या लाटेत करोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. नियमांचं पालन केलं नाही तरी करोना होवू शकतो. त्यामुळं कठोर वाटणारे निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जर नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही तर नाईलाजास्तव राज्यात पूर्वीप्रमाणे पुन्हा कडक लॉकडाऊन करावा लागू शकतो, असा इशारा अजित पवारांनी दिला आहे. तसंच, कर्नाटकचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं नागरिकांनी सहकार्य करावं, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

'करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राज्यातील प्रत्येक आमदारांच्या निधीतून एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही यावेळी पवारांनी दिली आहे. संबंधित आमदारांना मतदारसंघात हा निधी खर्च करता येईल,' असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे. तसंच, 'ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी उद्योजक सज्जन जिंदल यांच्याशी संवाद साधला असून, रायगडमधून पुण्यासाठी मुबलक पुरवठा होईल. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजक मुकेश अंबानी यांच्याशी संवाद साधला आहे,' अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

जावडेकरांशी संपर्क साधणार


'केंद्र सरकारकडून राज्याला ११२१ व्हेंटिलेटर मिळणार आहेत. त्यापैकी पुण्यासाठी १६५ व्हेंटिलेटर मंजूर आहेत. त्यापैकी अवघे दहा व्हेंटिलेटर मिळाले आहेत. व्हेंटिलेटर मिळण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधणार आहे,'अशी माहितीही अजित पवारांनी दिली आहे.

रेमडेसिवीरसाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु

'रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने खाजगी रुग्णालयांनी सरसकट सर्वच रुग्णांना या इंजेक्शनचा वापर करू नये, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या इंजेक्शनचा पुरवठा होण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत, असंही पवारांनी म्हटलं आहे. तसंच, केंद्र सरकारने लस आणि रेरेमडेसिव्हिर इंजेक्शन निर्यात केले नसते, तर तुटवडा निर्माण झाला नसता,' असंही पवार म्हणाले आहेत.

अन्यथा कारवाई करु

'ससून रुग्णालयात मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट बेड वाढवलेले आहेत. ससून रुग्णालय हे कायमस्वरुपी कोव्हिड रुग्णालय बनवणार नाहीत. डॉक्टरांच्या काही मागण्या आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांच्या काही मागण्या असतील तर सरकार म्हणून आम्ही त्यामध्ये लक्ष घालू मात्र, डॉक्टरांनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं तर सरकारला सुद्धा कठोर निर्णय घ्यावा लागेल,' असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज