अ‍ॅपशहर

FTIIच्या संपकरी विद्यार्थ्यांची होणार ‘छुट्टी’

दर वेळी निरनिराळ्या मागण्यांसाठी थेट संपाचेच हत्यार उपसणाऱ्या आणि वर्ग 'बायकॉट' करणाऱ्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांना यापुढे आपल्या संपाची किंमत सुट्ट्यांद्वारे मोजावी लागणार आहे. संस्थेच्या विद्या परिषदेच्या मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 26 Dec 2018, 12:55 pm
Swapnil.Jogi@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ftii


Tweet : @swapniljogi_MT

पुणे : दर वेळी निरनिराळ्या मागण्यांसाठी थेट संपाचेच हत्यार उपसणाऱ्या आणि वर्ग 'बायकॉट' करणाऱ्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांना यापुढे आपल्या संपाची किंमत सुट्ट्यांद्वारे मोजावी लागणार आहे. संस्थेच्या विद्या परिषदेच्या मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणीदेखील तत्काळ सुरू करण्यात आली आहे. शिवाय, उशिरा फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांना दंडही भरावा लागणार आहे.

अनुपम खेर यांच्या राजीनाम्यानंतर संस्थेचे नव्याने नियुक्त झालेले अध्यक्ष बी. पी. सिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या विद्या परिषदेच्या पहिल्याच बैठकीत संस्थेतील शिस्तीबाबत कडक पावले उचलण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे 'मटा'ला विश्वसनीय सूत्रांकडून समजले. त्याचाच भाग म्हणून, संपकरी विद्यार्थ्यांना त्यांच्या संपाच्या काळात बुडालेल्या दिवसांची भरपाई त्यांच्या हक्काच्या वार्षिक सुट्ट्यांमधून करून देणे आता भाग ठरणार आहे. विद्यार्थ्यांना नियमानुसारच आपली उपस्थिती यापुढे ठेवावी लागणार, हे यामुळे स्पष्ट झाले आहे. संस्थेच्या विद्या परिषदेची बैठक तब्बल पावणेदोन वर्षांनी झाल्यामुळे त्यात अनेक प्रलंबित विषयांवर चर्चा होणे अपेक्षित होते आणि झालेही तसेच. यात प्रामुख्याने अभ्यासक्रमात अपेक्षित असणारे महत्त्वाचे बदल, विद्यार्थ्यांना असलेल्या शैक्षणिक समस्या, संस्थेतील शिस्त आणि दैनंदिन कामकाजाचे विविध विषय चर्चिले गेले. सुमारे आठ तास ही बैठक सुरू होती. या बैठकीमुळे खेर यांच्या काळात प्रलंबित राहिलेल्या अनेक गोष्टींची पूर्तता होणे शक्य असल्याचे मानले जात आहे.

अभ्यासक्रमाची पुनर्रचना होणार?

'संस्थेच्या दोन वर्षांपूर्वी बदलण्यात आलेल्या अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीत संस्थेच्या विविध विभागांतील प्राध्यापक, अधिष्ठाता; तसेच चित्रपटाशी निगडित बाहेरील तज्ज्ञ सहभागी असतील. अभ्यासक्रमाचा सखोल आढावा घेऊन ही समिती अभ्यासक्रमात काही बदल आवश्यक आहे किंवा नाही, याचा निर्णय घेईल. येत्या तीन महिन्यांत हा आढावा घेणे अपेक्षित आहे,' असे संस्थेचे संचालक भूपेंद्र कॅन्थोला यांनी सांगितले. येत्या जानेवारीत या समितीची पहिली बैठक होईल. त्यात सुमारे १२ जणांचा समावेश असेल.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरही चर्चा

गजेंद्र चौहान यांच्या काळात संस्थेत लागू करण्यात आलेल्या नव्या अभ्यासक्रमाबाबत सुरुवातीच्या काही काळानंतर विद्यार्थी सातत्याने प्रश्न उपस्थित करत असल्याचे दिसून आले आहे. अभ्यासक्रमाची रचना, त्यासाठी असणारा अपुरा वेळ, लेखी परीक्षा आणि प्रात्यक्षिके यांच्यात नसणारा ताळमेळ यांसह अपुऱ्या वेळेत ठरावीक अभ्यासक्रम पूर्ण करताना होणारी परवड, अशा अनेक समस्या विद्यार्थ्यांना जाणवत आहेत. वेळोवेळी त्यांनी त्या लेखी स्वरूपात; तसेच संपाच्या माध्यमातून मांडल्याही आहेत. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांवरदेखील विद्या परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. विद्यार्थ्यांनी लेखी स्वरूपात या बैठकीसाठी आपले प्रश्न मांडले होते. येत्या काळात त्यावर सकारात्मक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे. गरज पडल्यास २०१९ मध्ये प्रवेश घेणाऱ्या तुकडीसाठी अभ्यासक्रमाची पुनर्रचनादेखील केली जाण्याची शक्यता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज