अ‍ॅपशहर

गांधीविचारांचा वापर सत्ता मिळविण्यासाठीच

‘महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे विचार लोक आणि राजकारण्यांमध्ये फारच अभावाने आढळतात. या विचारांचा वापर केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठीच केला जातो,’ अशी टीका संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी केली.

Maharashtra Times 10 Oct 2016, 4:31 am
डॉ. सदानंद मोरे यांची राजकारण्यांवर खरमरीत टीका
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gandhi thoughts only for power
गांधीविचारांचा वापर सत्ता मिळविण्यासाठीच


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे विचार लोक आणि राजकारण्यांमध्ये फारच अभावाने आढळतात. या विचारांचा वापर केवळ सत्ता हस्तगत करण्यासाठीच केला जातो,’ अशी टीका संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी केली.
‘डेमॉक्रॅटिक डायलॉग पब्लिकेशन नेटवर्क’ आणि ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ यांच्यावतीने गांधी जयंती सेवा सप्ताहानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वे‍ळी डॉ. मोरे यांच्या हस्ते ‘गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी’च्या विश्वस्त शोभना रानडे यांचा ९२व्या वाढदिवसानिमित्त, तर यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, महाराष्ट्र विद्यार्थी सहायक समितीचे सचिव डॉ. विकास आबनावे आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. मोरे म्हणाले, ‘गांधीजी आणि विनोबांचे विचार युवावर्गाला सांगायला हवेत; केवळ सप्ताहापुरते त्यांचे स्मरण योग्य नाही. राजकारण्यांना असलेली सत्तेची लालसा गांधींच्या विचारांना विसरायला भाग पाडत आहे. या विचारांचा वापर सध्या केवळ राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी केला जात आहे. त्यामुळे तरुणपिढीच्या इच्छा, अपेक्षा समजून त्यांच्यात गांधी आणि विनोबांचे विचार रुजवले पाहिजेत.’ रानडे यांनी भावे आणि महात्मा गांधी यांच्या आठवणी सांगून आपला आजवरचा प्रवास विशद केला. त्या म्हणाल्या, ‘महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांनीच आजवर काम करीत आले. विनोबांच्या आदेशानुसारच १९७३पासून आगाखान पॅलेस येथे काम करायला सुरुवात केली आणि आजही करीत आहे.’ पवार म्हणाले, ‘आधुनिक जगात माणूस त्याच्या जीवनातील मुलभूत गोष्टींपासून आणि चांगल्या विचारांपासून दूर गेला आहे. त्यामुळेच जगात मोठ्या प्रमाणात प्रश्न आणि समस्या निर्माण होत आहेत. महात्मा गांधींचे विचार अंमलात आणल्यास सध्याच्या अनंत समस्यांवर आपल्याला उपाय सापडतील.’ पुरस्काराला उत्तर देताना श्रीमती काकडे यांनी मनोगत व्यक्त केले. खोरे यांनी प्रास्ताविक केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज