अ‍ॅपशहर

लोकमान्यांचा वारसा सांगणारा गणेशोत्सव

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जनजागृतीसाठी उपयोगात आणायची होती. समाजाला एकसंध करण्यासाठी गणेशोत्सव सुरू झाला.

Maharashtra Times 15 Sep 2018, 3:40 am
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganesh festival that tells the heritage of the people
लोकमान्यांचा वारसा सांगणारा गणेशोत्सव


भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा जनजागृतीसाठी उपयोगात आणायची होती. समाजाला एकसंध करण्यासाठी गणेशोत्सव सुरू झाला. केसरी-मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून गणेशोत्सवाचा प्रचार आणि प्रसार सुरू झाला. 'केसरी-मराठा' ट्रस्ट म्हणजेच 'केसरी'ची, संस्थेने १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात केली. मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरी गणपतीचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. लोकमान्यांचा वारसा सांगणाऱ्या या गणेशोत्सवाने वैचारिक व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम अशी परंपरा कायम ठेवली आहे.

केसरी गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाला आनंददायी व मंगलमय वातावरणात सुरुवात झाली आहे. दर वर्षी मूर्तीकार गोखले यांच्याकडून मूर्ती घेऊन पारंपरिक पद्धतीने सवाद्य मिरवणुकीने पालखीतून श्रींची मूर्ती टिळकवाड्यात आणली जाते. टिळक वाड्यातील गणेश मंदिरातील कायमस्वरूपी चांदीची गणेशमूर्ती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात गणपतीचे जे वर्णन केले आहे, त्यानुसार साकारण्यात आली आहे. शेला, दागिने, प्रतिके, मुकुट, गंडस्थळ ही या मूर्तीची वैशिष्ट्ये आहेत. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २२ सप्टेंबरपर्यंत टिळकवाड्यातील सभामंडपात रोज सायंकाळी ६.३० वाजता विविध कार्यक्रमांची पर्वणी अनुभवता येणार आहे. केसरीचे विश्वस्त डॉ. दीपक टिळक यांच्या मार्गदर्शनानुसार व विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांच्या नेतृत्वाखाली हे मंडळ काम करत आहे.

लोकमान्य पूर्वी विंचुरकरांच्या वाड्यात राहत असत. तिथे १८९४ मध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली. या उत्सवाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणे हा टिळकांचा मुख्य हेतू असल्याने या गणपती उत्सवात प्रबोधनात्मक व्याख्यानांवर अधिक भर दिला जात असे. स्वतः टिळकांचेही व्याख्यान त्यात होई. १८९५ मध्ये विंचुरकरांच्या वाड्यात लोकमान्यांचे 'महाभारतातील दोन महापुरुष' या विषयावर व्याख्यान झाले. 'श्रीकृष्ण आणि भीष्माचार्य हे दोन प्रमुख राजकारणी होते,' असे प्रतिपादन त्यांनी केले. विंचुरकर वाड्यातील गणेशोत्सवात पांगारकर, प्रा. जिनसीवाले, शिवरामपंत परांजपे, तात्यासाहेब केळकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आदी वक्त्यांची भाषणे होत. १९०५ पासून केसरी संस्थेचा गणपती गायकवाड वाड्यात (केसरीवाडा) होऊ लागला.

केसरीवाडा गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रबोधनात्मक कार्यक्रम व व्याख्यानांवर असलेला भर. अगदी प्रारंभापासून येथे जी व्याख्याने झाली, त्याचे विषय लोकजागृती व प्रबोधन करणारे होते. १९०५ च्या उत्सवात लोकमान्य टिळकांनी 'देह आणि आत्मा' या विषयावर व्याख्यान दिले. १९०७ मध्ये सीताराम केशव दामले यांचे 'राष्ट्रीय शिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०८ मध्ये महर्षी अण्णासाहेब पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी यांचे 'लोकशिक्षण' या विषयावर व्याख्यान झाले. १९०९ मध्ये 'धर्म आणि शास्त्र' या विषयावर व्याख्यान झाले. गणेशोत्सवात प्रबोधनावर भर असावा, हा लोकमान्यांचा हेतू असल्याचे त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणातून स्पष्ट होते.

उत्सवातील व्याख्यानांनी ज्ञान मिळते. मेळ्यातील पदांनी सामाजिक, धार्मिक गोष्टी कानांवर पडून अंतःकरणात भिनतात. १० दिवस उत्सव होऊन विसर्जनानंतर घरी गेल्यावर तुम्हाला कसेनुसे वाटेल. ज्या गोष्टीची सवय होते, ती गोष्ट नाहीशी झाल्याने मनाला चटका लागणे स्वाभाविक आहे. यावर माझे सांगणे आहे, की हजारो वर्षे जी गोष्ट तुम्ही मिळवली, ती गोष्ट म्हणजे स्वराज्य! ते गेल्याबद्दल तुमच्या मनाला किती चटका लागला पाहिजे याचा विचार करा.

- लोकमान्य टिळक (१९०७ मध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या सांगतेनंतर केलेल्या भाषणातील अंश)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज