अ‍ॅपशहर

पिट्सबर्गचा आगळा गणेशोत्सव

आजकाल घरटी एक मराठी माणूस परदेशात असतो, असे म्हणतात आणि ते खरंही आहे. आणि मराठी माणूस म्हटला, की गणेशोत्सव हा आलाच. मग तुम्ही महाराष्ट्रात असा, मायदेशात असा किंवा अगदी देशाबाहेर.

Maharashtra Times 12 Sep 2016, 7:51 pm
आजकाल घरटी एक मराठी माणूस परदेशात असतो, असे म्हणतात आणि ते खरंही आहे. आणि मराठी माणूस म्हटला, की गणेशोत्सव हा आलाच. मग तुम्ही महाराष्ट्रात असा, मायदेशात असा किंवा अगदी देशाबाहेर. खरं तर मराठी माणसासाठी दिवाळीपेक्षाही मोठा सण म्हणजे गणेशोत्सव असतो. अमेरिकेतील सगळ्याच मराठी मंडळांमध्ये गणेशोत्सव उत्साहाने साजरा केला जातो आणि मग त्यात पिट्सबर्गचे मराठी मंडळ कसे बरे मागे असेल? गेली तीसहून अधिक वर्षे येथे उत्साहात गणपती स्थापिला जातो. महाराष्ट्रात गणपती यायच्या काही दिवस आधी जसे एक वातावरण तयार होते ना, अगदी तसेच इथेही असते. बाप्पा यायच्या आधीची सगळ्यांची लगबग, तयारी अगदी सगळे तसेच!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ganeshotsav in pittsburgh
पिट्सबर्गचा आगळा गणेशोत्सव


खरे तर गेल्या वर्षीपर्यंत इथे एक दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जात असे; पण या वर्षीपासून केवळ मराठीच नव्हे, तर सगळेच भारतीय मिळून मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव साजरा करतील, या हेतुने इथे सात दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पिट्सबर्ग मराठी मंडळ आणि हिंदू-जैन मंदिर एकत्र येऊन व्यवस्थापन पाहत आहेत. लोक एकत्र यावे, या अतिशय उदात्त हेतूने लोकमान्य टिळकांनी कित्येक वर्षांपूर्वी सुरू केलेला गणेशोत्सव आजही अगदी साता-समुद्रापार भारतीय लोकांना एकत्र यायला उद्युक्त करतो आहे, याहून गणेशोत्सवाचे मोठे यश ते कोणते?

सकाळी ढोल-लेझीम, झांजा, जमलेल्या सर्व गणेशभक्तांचा पुरेपूर उत्साह आणि गणरायाचा गजर अशा भारलेल्या वातावरणात गणरायाचे आगमन झाले आहे. पारंपरिक पोशाखातील लहान-थोर या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. दर वर्षी येथील मराठी मंडळी वेशभूषेचा एक प्रकार ठरवतात. कधी पैठण्या, तर कधी पुरुषांसाठी बाराबंदी. या वर्षी कांजीवरमचा थाट होता. श्री गणेशाची लेझीम-ढोलाच्या गजरात स्थापना, मग महाप्रसाद आणि त्यानंतर रोज सकाळ-संध्याकाळ सात दिवस आरती आणि महाप्रसाद असा कार्यक्रम आहे.

गणेशोत्सव म्हटले, की आपल्याला आठवतात ते अभिरुचीपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम. मनोहर दाम्पत्याच्या दिग्दर्शनाखाली यंदा पिट्सबर्ग महाराष्ट्र मंडळाच्या स्थानिक कलावंतांनी बसवलेला आगळा वेगळा संगीतसंध्येचा - भावगीते आणि भक्तीगीतांचा कार्यक्रमदेखील होणार आहे. त्याबद्दल येथे सर्वांनाच उत्सुकता आहे. त्यानंतर ‘पुनरागमनायच’ म्हणत बाप्पाचे विसर्जन.

खरे तर गणपती उत्सवाचे हे दिवस परदेशातील लोकांना आपल्या मायेच्या माणसांची, आपल्या बालपणाची आठवण करून देतात. गणपतीचे दहा दिवस अक्षरशः आपण महाराष्ट्रात तर नाही ना, असे वाटते; कारण रोज कोणा ना कोणाकडे आरती, मोदक आणि बाप्पाचा गजर. आपल्या घरापासून हजारो मैलांवर राहूनदेखील गणेशोत्सवाच्या निमित्ताने हा बाप्पा आम्हाला मनापासून आनंद देऊन जातो.

गणपती बाप्पा मोरया!


- श्वेता चक्रदेव-डोंगरे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज