पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि ११ हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली. शिवाजीनगर ते वसंत टॉकीज या दरम्यान हा प्रकार घडला.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे, ता. मावळ येथे राहणाऱ्या २६ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यावरून फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला खरेदीसाठी पुणे शहरात आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी त्या तळेगाव दाभाडे येथून लोकलने शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे उतरल्या. तेथून शिवाजीनगर-कात्रज या पीएमपी बसमधून प्रवास करीत बुधवार पेठेतील शिवाजी रस्त्यावर वसंत टॉकीजसमोरील पीएमपी बसथांब्यावर उतरल्या.
या दरम्यान बसमधील गर्दीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खांद्याला अडकविलेल्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि ११ हजार रुपयांची रोख रक्कम असा २९ हजार रुपयांचा ऐवज चोरला. उपनिरीक्षक अजितकुमार पाटील पुढील तपास करीत आहेत.