अ‍ॅपशहर

सभागृह नेत्यांनी बदनामी केली

म टा प्रतिनिधी, पुणे महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सर्वसाधारण सभेमध्ये जाणूनबुजून आपली बदनामी करणारे वक्तव्य केले...

Maharashtra Times 24 May 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, पुणे

महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी सर्वसाधारण सभेमध्ये जाणूनबुजून आपली बदनामी करणारे वक्तव्य केले. बदनामी केल्याप्रकरणी भिमाले यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करावा, असा अर्ज पालिकेतील काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दिला आहे. सभागृह नेते भिमाले यांच्या वागणुकीबाबत संभाजी ब्रिगेड आणि फुले शाहू आंबेडकर विचारमंचनेही महापौर मुक्ता टिळक यांना पत्र देत त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्यासह मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनीही भिमाले यांना समज द्यावी, असे पत्र दिले आहे.

सर्वसाधारण सभेमध्ये अतिक्रमण निरीक्षकाला झालेली मारहाण आणि त्यानंतर त्याच्या विरोधात दाखल झालेला खंडणीचा गुन्हा, यावर शिंदे यांनी प्रशासनाकडे खुलासा मागविला होता. या चर्चे दरम्यान भिमाले आणि शिंदे यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले. त्या वेळी भिमाले यांनी शिंदे यांचा एकेरी उल्लेख करून फ्रॉड, एजंट, पैसे खाता, असे व्यक्तिगत आरोप केले. या प्रकारामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अन्य सभासदांच्या मागणीनुसार महापौर टिळक यांनी दोन्ही बाजूंनी केले गेलेले वक्तव्य कामाकाजातून काढण्याचे आदेश दिले. भिमाले यांच्या वक्तव्याने बदनामी झाल्याने त्यांच्या विरुद्ध अब्रूनुकसानीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिंदे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पत्राद्वारे केली आहे. भिमाले यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या बाबतही अशीच अपमानास्पद भाषा वापरली होती, असे पत्र मनसेचे मोरे यांनी महापौर टिळक यांना दिले आहे. सभागृह नेत्याचा सभागृहावर अंकुश हवा. परंतु, त्यांचे स्वत:वरच नियंत्रण राहिलेले नाही, असे यामध्ये म्हटले आहे.

दरम्यान, अशा घटनांमुळे सभागृहाची प्रतिमा मलिन होत असल्याचे पत्र तुपे यांनी महापौरांना दिले आहे. सभागृहाची प्रतिष्ठा या प्रकारामुळे संपली असून पुणेकरांची मान शरमेने खाली गेली असल्याची टीका माजी महापौर अंकुश काकडे यांनी केली. संभाजी ब्रिगेड आणि फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीनेही याच आशयाची पत्रे देण्यात आली आहेत.

प्रसिद्धीसाठी हा 'स्टंट' : भिमाले

सभागृहातील विषय बाहेर आणून प्रसिद्धी मिळविण्यासाठी अरविंद शिंदे यांनी केलेला हा स्टंट आहे, असे प्रत्युत्तर सभागृह नेते भिमाले यांनी दिले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज