पतीसह मित्र, सासू, सासऱ्यावर गुन्हा दाखल
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर अॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक प्रकार वाकड येथे घडला आहे. तसेच, पतीने पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हे फोटो ऑफिसमध्ये ई-मेल करून पत्नीची बदनामी केल्याचा प्रकारही पतीने केला. २४ जून २०१२ ते ११ डिसेंबर २०१९ या दरम्यान इंदूर, वाकड, चेन्नई व नोएडा येथे घडला. या प्रकरणी ३४ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासरे, सासू व पतीच्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनार, फिर्यादी आरोपी पती व सासू-सासरे यांच्या सोबत इंदूर, चेन्नई व नोएडा, वाकड येथे राहात होत्या. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेतला. तसेच, तिच्याकडे पगाराच्या रकमेची मागणी केली. त्यासाठी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केली. तसेच, मारहाण व शिवीगाळ करून अॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी पतीने दिली. विवाहिता राहत असलेल्या वाकड येथील घरातून पतीने व मित्राने तिच्या परवानगीशिवाय घरातील सर्व साहित्य व दागिने असा पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच, तुझे फोटो एडिट करून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून तुझ्या नातेवाइकांना पाठवीन, अशी धमकी दिली. हे फोटो ऑफिसमध्ये ई-मेल करून विवाहितेची बदनामी केली. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश स्वामी तपास करीत आहेत.