अ‍ॅपशहर

‘पक्षाने आदेश दिल्यास मुख्यमंत्री होईन’

म टा...

Maharashtra Times 10 Dec 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पक्षाने आदेश दिल्यास मी गोव्याचा मुख्यमंत्री होईन, अशी माहिती केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांचे शनिवारी उद्घाटन केल्यानंतर पत्रकारांना दिली.

विद्यापीठाच्या आरोग्ये केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले असून, तेथील आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि दंतचिकित्सा विभागाचे उद्घाटन नाईक यांनी केले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ नितीन करमळकर, डॉ. परवेझ ग्रँट, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, डॉ. सोमनाथ पाटील, प्रसेनजीत फडणवीस, महेश आबाळे, डॉ. जयंत देवपुजारी, डॉ. आशुतोष गुप्ता, वैद्य योगेश बेंडाळे, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत दूधगावकर आदी उपस्थित होते. या वेळी आरोग्य केंद्रातून वैद्यकीय सेवा पुरविण्याबाबत रुबी हॉल क्लिनिकसोबत तर, दंतचिकित्सेबाबत डॉ. डी. वाय. पाटील डेन्टल कॉलेजशी सामंजस्य करार करण्यात आला. दंतचिकित्सा सेवा सुरू झाली आहे, तर आपत्कालिन वैद्यकीय सेवा १ जानेवारी २०१९ पासून उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशा सर्वांसाठी असतील. रुबी हॉल क्लिनीकने आरोग्य केंद्राला अत्याधुनिक रुग्णवाहिका दिली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. त्यामुळे नाईक यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार का, अशा चर्चा सुरू आहेत. याबाबत नाईक म्हणाले, 'मी भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षाने संधी दिल्याने चार वेळा खासदार झालो. मुख्यमंत्री पदाचे निर्णय वरिष्ठ पातळीवर होतात. त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला याबाबत काही माहिती नाही. पक्षाने आदेश दिल्यास, मी गोव्याचा मुख्यमंत्री होईल.' डॉ. करमळकर म्हणाले, 'विद्यापीठातील वैद्यकीय सेवांचे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करण्यात आले आहे. त्याद्वारे चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.' पांडे यांनी प्रास्ताविक केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज