अ‍ॅपशहर

प्राप्तिकर विभागाचे डॉक्टरांवर ‘ऑपरेशन’

पुण्यासह राज्यातील प्रतिष्ठित डॉक्टरांच्या क्लिनिक, तसेच घरांवर छापे टाकून प्राप्तिकर विभागाने शनिवारी ‘ऑपरेशन’ सुरू केले आहे. या कारवाईत पुण्यातील नऊ डॉक्टरांवर कारवाई असून त्यात काही दाम्पत्यांचा समावेश आहे.

Maharashtra Times 12 Feb 2017, 2:00 am
महाराष्ट्र टाइम्स.कॉम income tax department raids on doctior
प्राप्तिकर विभागाचे डॉक्टरांवर ‘ऑपरेशन’

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यासह राज्यातील प्रतिष्ठित डॉक्टरांच्या क्लिनिक, तसेच घरांवर छापे टाकून प्राप्तिकर विभागाने शनिवारी ‘ऑपरेशन’ सुरू केले आहे. या कारवाईत पुण्यातील नऊ डॉक्टरांवर कारवाई असून त्यात काही दाम्पत्यांचा समावेश आहे.

डॉक्टरांकडून उत्पन्न दडविल्याच्या संशयावरून हे छापे टाकण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागातर्फे सांगण्यात येत आहे. राज्यात अशा स्वरूपाची डॉक्टरांवरील ही पहिलीच कारवाई असल्याने मोठ्या प्रमाणात वैद्यकविश्वात खळबळ उडाली. या कारवाईमुळे डॉक्टर करीत असलेल्या ‘कट प्रॅक्टिस’ला अधिकच पुष्टी मिळाल्याने आता पुढचा नंबर कोणाचा अशीच डॉक्टरांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पुणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर येथे एकाचवेळी ही कारवाई करण्यात आली. प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे छापे टाकले.

पुण्यातील ११ प्रतिष्ठित डॉक्टरांवर छापे टाकण्यात आले. पुण्यात एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ व त्यांची पत्नी, एक अस्थिरोगतज्ज्ञ, एक वंध्यत्व निवारणतज्ज्ञ, एक बालरोगतज्ज्ञ, एक प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर व त्यांची पत्नी, दोन हृदयरोगतज्ज्ञ आणि एका दाम्पत्यासह रेडिओलॉजिस्टचा समावेश आहे. शहरातील काही क्लिनिक व हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी मोठी रक्कम आकारण्यात येते. त्यासाठी रोखीने पैसे घेतले जात असले, तरी त्यासाठी पावती दिली जात नसल्याच्या तक्रारी प्राप्तिकर विभागाकडे आल्या होत्या. डॉक्टरांकडून चोरी छुपे होत असलेल्या कट प्रॅक्टिसबद्दलही अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. याच संशयावरून त्यांच्या घरावर व क्लिनिकवर छापे टाकल्याचे प्राप्तिकर विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारे डॉक्टरांवर छापे पडले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज