अ‍ॅपशहर

भारतीय ऑर्गन प्रथमच अमेरिकेत

नाट्यपदांसाठी सर्वसामान्यपणे वाजवले जाणारे ऑर्गन हे वाद्य प्रथमच भारतातून अमेरिकेत चालले आहे.

Maharashtra Times 8 Dec 2016, 3:00 am
Asawari.Chiplunkar@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indian organ exported in usa
भारतीय ऑर्गन प्रथमच अमेरिकेत

Tweet : asawariMT

पुणे : आडिवरे (जि. रत्नागिरी)येथे राहाणाऱ्या उमाशंकर उर्फ बाळ दाते यांना ऑर्गनचा कारखाना काढतो; म्हणून लोकांनी वेड्यात काढले होते. आज त्यांनीच तयार केलेले, नाट्यपदांसाठी सर्वसामान्यपणे वाजवले जाणारे ऑर्गन हे वाद्य प्रथमच भारतातून अमेरिकेत चालले आहे. बालगंधर्व यांच्या काळापासून आत्तापर्यंत भारतात आलेल्या ऑर्गन या युरोपमधून येत असत. मात्र, पूर्णपणे भारतीय बनावटीची आणि रत्नागिरीतील गावात राहून दाते यांनी तयार केलेली ऑर्गन प्रथमच भारतातून बाहेर चालली आहे, तीही डेव्हिड एस्टेस या सॅनफ्रान्सिस्कोच्या बँड वादकाच्या मागणीवरून.

भारतात ऑर्गन वाद्य वाजवता येणारे कलाकार अगदी हाताच्या बोटावर राहिलेले असतानाही दाते हे वाद्य टिकवण्याच्या प्रयत्नात आहेत. ऑर्गन बनवण्यासाठी वापरण्यात येणारे लाकूड जपले, तर शंभर वर्षे टिकणाऱ्या या वाद्याची निर्मिती भारतात फक्त दाते यांच्याकडेच होते. आत्तापर्यंत या वाद्यासाठीच्या पट्ट्या (रीड्स) फक्त भारताबाहेरच उपलब्ध होत्या. १९५०नंतर अमेरिकी रीड्सची निर्मितीही थांबली. त्याच शोधात जर्मनी आणि पॅरिसपर्यंत डेव्हिड हा बँडवादक पोहोचला. मात्र, दाते यांनी फेसबुकवर टाकलेली नव्या ऑर्गन निर्मितीसंदर्भातील पोस्ट त्याने पाहिली आणि त्यांचा माग घेत तो आडिवरेत पोहोचला. त्याने लिहिलेल्या पोस्टमुळे दाते यांच्या कामाची दखल नंतर एका युरोपियन मासिकानेही घेतली आणि आता डेव्हिडने दिलेल्या ऑर्डरमुळे पूर्णपणे भारतीय बनावटीची पहिली ऑर्गन अमेरिकेत चालली आहे.

त्यात ३६ प्रकारचे ध्वनी निघतात. खर्ज स्वरासाठी क्रमांक १६, स्त्री आवाजासाठी क्रमांक चार आणि पुरुष आवाजासाठी क्रमांक आठ असे अमेरिकन बँडच्या दृष्टीने सोयीचे तीन स्टॉप्स (स्टॉपर) यात आहेत. १५ दिवसांत तयार झालेली ही दाते यांनी तयार केलेली ५५वी ऑर्गन आहे. एक जानेवारी २०१७ रोजी ती जहाजाने अमेरिकेला रवाना होणार आहे. विमानातून जाण्याच्या दृष्टीने सोयीची अशी सर्वांत कमी वजनाची (१८ किलो) फोल्डिंगची ऑर्गन तयार करण्याचा रेकॉर्डही दाते यांचाच आहे. ते भारतातील ऑर्गन निर्मितीसाठीचे पेटंट मिळवण्याच्याही प्रयत्नात आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज