अ‍ॅपशहर

प्राचीन मूर्तीचा भारताकडे अधिकृत ताबा

‘प्राचीन हडप्पा संस्कृतीचे प्रतीक मानली जाणारी नर्तिकेची (डान्सिंग गर्ल) मूर्ती अधिकृत करारानुसार भारताकडे आली असून, या मूर्तीवर पाकिस्तानला कोणताही दावा करता येणार नाही,’ अशी माहिती ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली. मोहेंजोदडो येथून १९२६ साली सापडलेली नर्तिकेची मूर्ती लाहोर संग्रहालयाच्या मालकीची असून, भारताकडून ती परत मिळवण्याबाबत ‘युनेस्को’ला साकडे घालणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

Maharashtra Times 13 Oct 2016, 6:24 am
डॉ वसंत शिंदे यांची माहिती; हडप्पा- मोहेंजोदडोवर दोन्ही देशांचा समान हक्क
महाराष्ट्र टाइम्स.कॉम indus dancing girl is officially in indias custody
प्राचीन मूर्तीचा भारताकडे अधिकृत ताबा


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘प्राचीन हडप्पा संस्कृतीचे प्रतीक मानली जाणारी नर्तिकेची (डान्सिंग गर्ल) मूर्ती अधिकृत करारानुसार भारताकडे आली असून, या मूर्तीवर पाकिस्तानला कोणताही दावा करता येणार नाही,’ अशी माहिती ज्येष्ठ पुरातत्त्व शास्त्रज्ञ आणि डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिली. मोहेंजोदडो येथून १९२६ साली सापडलेली नर्तिकेची मूर्ती लाहोर संग्रहालयाच्या मालकीची असून, भारताकडून ती परत मिळवण्याबाबत ‘युनेस्को’ला साकडे घालणार असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

प्राचीन नर्तिकेची मूर्ती भारताकडून परत मिळवण्यासाठी लाहोर येथील जावेद इकबाल जाफरी या वकिलाने नुकतीच लाहोर हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. १०.५ सेंटीमीटर उंचीची ब्रॉन्झ धातूमध्ये बनवलेली ही मूर्ती स्वातंत्र्यापूर्वी लाहोर संग्रहालयाच्या ताब्यात होती. ही मूर्ती पाकिस्तानचा वारसा असून, ती परत मिळावी यासाठी ‘युनेस्को’ला साकडे घालणार असल्याचे पाकिस्तानच्या राष्ट्रीय संग्रहालयाने म्हटले आहे. मात्र, ‘ही मूर्ती अधिकृत करारानुसार भारताच्या ताब्यात आली असून, पाकिस्तानला ती देण्याचा प्रश्नच येत नाही,’ असा खुलासा डॉ. शिंदे यांनी केला आहे.

डॉ. शिंदे म्हणाले, ‘प्राचीन हडप्पा संस्कृती दक्षिण आशियामध्ये वीस लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरली होती. यामध्ये पाकिस्तानच्या सिंध, बलुचिस्तान आणि पंजाबचा भाग असून, भारतातील हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश होतो. या संस्कृतीचे अवशेष हे कोणा एका देशाचा वारसा नसून दक्षिण आशियाचा हा वारसा मानण्यात येतो. हडप्पा आणि मोहेंजोदडो या ठिकाणांचे उत्खनन स्वातंत्र्यपूर्व काळात १९३० च्या दशकात आर्किओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या पश्चिम विभागांतर्गत करण्यात आले होते. या विभागाचे मुख्यालय पुण्यात होते. उत्खनन करणाऱ्या तज्ज्ञांमध्ये सर जॉन मार्शल, आर. डी. बॅनर्जी, माधव स्वरूप वत्स, अर्नेस्ट मॅके आदींचा समावेश होता.’

‘स्वातंत्र्यानंतर दोन्ही देशांमधील सांस्कृतिक वारशांची वाटणी अधिकृत करारानुसार करण्यात आली. हडप्पा- मोहेंजोदडो या ठिकाणांचे उत्खनन स्वातंत्र्यपूर्व काळात करण्यात आल्यामुळे या ठिकाणांहून मिळालेल्या वस्तूंवर दोन्ही देशांचा अधिकार असल्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार या दोन ठिकाणांहून, तसेच तक्षशिला येथून सापडलेल्या वस्तूंची दोन्ही देशांत वाटणी करण्यात आली. या वाटणीनुसार मोहेंजोदडो येथून सापडलेली नर्तिकेची मूर्ती भारताकडे, तर याच संस्कृतीचे आणखी एक प्रतीक असणारी दगडात कोरलेली मुख्य पुरोहिताची (चीफ प्रिस्ट) मूर्ती पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आली. अशाच प्रकारे या प्राचीन स्थानांवरून सापडलेली धातूची अवजारे, मातीची भांडी, हाडे, दागिने आदी वस्तूंचे सामान वाटप करण्यात आले होते,’ असेही ते म्हणाले.

हडप्पा संस्कृतीचे मूळ भारतात !

‘स्वातंत्र्यपूर्व काळात हडप्पा संस्कृतीचे अवशेष प्रामुख्याने पाकिस्तानच्या बाजूकडील पंजाब आणि सिंध प्रांतात एकवटल्याचे मानण्यात येत होते. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात भारतामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या उत्खननातून दोन हजारपेक्षा अधिक हडप्पाकालीन ठिकाणे भारतात असल्याचे समोर आले. त्या काळातील दोन तृतीयांश स्थळे भारतामध्ये असून, हडप्पा संस्कृतीचे मूळ भारतात असल्याचे सिद्ध झाले आहे. असे असतानाही पाकिस्तानने त्यांच्याकडील अवशेष भारताला परत द्यावेत असा दावा भारताने कधी केला नाही,’ असे डॉ. शिंदे यांनी नमूद केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज