अ‍ॅपशहर

राज्यातील कारागृह तुडुंब

राज्यातील कारागृह कैद्यांनी तुडुंब भरले असून कैदी ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. राज्यातील काही मध्यवर्ती व काही जिल्हा कारागृहांत तर दुप्पट कैदी ठेवले जात आहेत.

Shrikrishna kolhe | Maharashtra Times 10 Jan 2018, 3:00 am
मध्यवर्ती कारागृहांत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी; उपाययोजनांची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम jails in maharashtra full state data reveals
राज्यातील कारागृह तुडुंब


पुणे : राज्यातील कारागृह कैद्यांनी तुडुंब भरले असून कैदी ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. राज्यातील काही मध्यवर्ती व काही जिल्हा कारागृहांत तर दुप्पट कैदी ठेवले जात आहेत. विशेष म्हणजे महिला कारागृहांत महिला कैदीसुद्धा क्षमतेपेक्षा अधिक ठेवले जात असल्याचे कारागृहाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कारागृहांची क्षमता वाढविण्याठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
राज्य ‘कारागृह अहवाल २०१६-१७’मध्ये कैद्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. राज्यात ५४ कारागृह आहेत. त्यापैकी ९ मध्यवर्ती कारागृह, ३३ जिल्हा करागृह, १३ खुले कारागृह आहेत. राज्यातील कारागृहांत कैदी ठेवण्याची क्षमता ही २३ हजार ९९२ एवढी आहे. मात्र, प्रत्यक्षात राज्यातील कारागृहांत ३१ हजार २१४ कैदी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये पुरुष कैद्यांची क्षमता २२ हजार ६९१ असताना प्रत्यक्षात कारागृहांमध्ये २९ हजार ८०२ कैदी ठेवण्यात आले आहेत. राज्यातील कारागृहांमध्ये महिला कैद्यांची क्षमता ही १२५१ असताना १४१२ महिला कैदी कारागृहांत आहेत. सध्या राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा सात हजार कैदी जास्त असल्याचे समोर आले आहे.
राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांच्या क्षमतेचा विचार केल्यास येरवडा, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, तळोजा, कोल्हापूर, नाशिक रोड या नऊ मध्यवर्ती कारागृहात क्षमतेपेक्षा सर्वाधिक कैदी ठेवले जात असल्याचे समोर आले आहे. नऊ मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ही १४ हजार ८४१ आहे. मात्र, सध्या या ठिकाणी २२ हजार ४६ कैदी ठेवण्यात आले आहेत. येरवडा कारागृहाची क्षमता २ हजार ४४९ असताना त्या ठिकाणी चार हजार ५५० कैदी ठेवले जात आहेत. तर, मुंबई मध्यवर्ती कारागृहाची क्षमता आठशे असताना त्या ठिकाणी तब्बल २ हजार ८८४ एवढे कैदी आहेत. औरंगाबाद, तळोजा आणि नाशिक रोड कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत. तसेच, काही जिल्हा कारागृहाची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे कारागृहाची संख्या व क्षमता वाढविण्याची गरज आहे. अलिकडे काही कारागृहात बराकी बांधण्याचे काम सुरू आहे. पण, त्या बराकी कैद्यांसाठी पुरेशा नाही. नवीन कारागृह उभारण्याची गरज असल्याचे कारागृह विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
(क्रमश:)

कारागृहांतील कैदी

२३,९९२
राज्यातील तुरुंगांत कैदी ठेवण्याची क्षमता
...
३१,२१४
कारागृहात प्रत्याक्षात ठेवण्यात आलेले कैदी
...
१४,८४१
मध्यवर्ती कारागृहात कैदी ठेवण्याची क्षमता
...
२२,०४६
मध्यवर्ती कारागृहात प्रत्यक्षात ठेवलेले कैदी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज