अ‍ॅपशहर

नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची लूट

जॉब देणाऱ्या कन्सल्टन्सींकडून उमेदवारांची फसवणूक होते आहे.

Maharashtra Times 15 Jul 2016, 3:00 am
Harsh.Dudhe @timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम job consultancy cheated young people in pune
नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांची लूट

पुणे : ‘जॉबची काळजी करू नका. केवळ ५०० रुपये रजिस्ट्रेशन फी भरा, त्यानंतर तुम्हाला आम्ही लगेच एका कंपनीत मुलाखतीसाठी पाठवू. कंपनीकडून ऑफर लेटर आले, की एका महिन्याचा पूर्ण किंवा अर्धा पगार द्यावा लागेल किंवा नोकरीप्रमाणे पाच ते १० हजार रुपये द्यावे लागतील,’ अशा प्रकारचा संवाद शहरातील काही ‘जॉब कन्सल्टन्सीं’च्या कार्यालयात ऐकायला मिळत आहे. मात्र, प्रत्यक्षात यापैकी कोणतीच गोष्ट होत नसल्याने नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांची आर्थिक फसवणूक होत आहे.
डिप्लोमा, इंजिनीअरिंग आणि व्यवस्थापन आदी शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्यांना औद्योगिक कंपन्या आणि आयटी इंडस्ट्रीमध्ये सहज नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांचे कॉलेजमधून प्लेसमेंट होत नाही, असे विद्यार्थी जॉब मिळविण्यासाठी जॉब कन्सल्टन्सी शोधतात. अशा वेळी कन्सल्टन्सीडून ५०० ते ७०० रुपये रजिस्ट्रेशन फी आणि ‘बायोडेटा’च्या दोन ते पाच प्रती घेण्यात येतात. या वेळी त्यांना विविध कंपनीत मुलाखतीच्या पाच संधी देण्यात येतील, असे सांगण्यात येते. त्यामुळे विद्यार्थीदेखील कंपनीमध्ये मुलाखतीची संधी मिळणार म्हणून पैसे भरतात.
मात्र, प्रत्यक्षात या कन्सल्टन्सीकडून कंपनीमध्ये मुलाखतीच्या एक किंवा दोन संधी दिल्या जातात. काही कन्सल्टन्सी संधीच देत नाहीत. काही कन्सल्टन्सी ज्या ‘जॉब प्रोफाइल’साठी विद्यार्थ्याने किंवा तरुणाने पैसे भरले आहेत, त्या प्रोफाइलसाठी मुलाखतीच्या संधी न देता त्यापेक्षा दुसऱ्या किंवा दुय्यम दर्जाच्या मुलाखतीची संधी देतात. या प्रोफाइलमध्ये विद्यार्थ्याने मुलाखत दिली, की त्याला कन्सल्टन्सीकडून निवड झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर कन्सल्टन्सीकडून कंपनीमध्ये निवड झाल्याचे ‘ऑफर लेटर’ देण्यासाठी किंवा देताना एका महिन्याचा पूर्ण किंवा अर्धा पगार देण्याची मागणी केली जाते. काही कन्सल्टन्सी ५ ते १० हजार रुपयांची मागणी करतात.
मात्र, बहुतेक ठिकाणी हे ‘ऑफर लेटर’ दिले जात नाही. ज्या कन्सल्टन्सी हे ‘ऑफर लेटर’ देतात, त्या पत्रातील ‘जॉब प्रोफाइल’ वेगळे असल्याने विद्यार्थी ऑफर नाकारतात. विद्यार्थ्यांकडून कन्सल्टन्सीच्या सर्व अटी मान्य आहेत, असे पत्र लिहून घेण्यात येते. मात्र, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी पैसे भरलेले असतात. विद्यार्थी पुन्हा कन्सल्टन्सीकडे पैशांची मागणी करतात तेव्हा कन्सल्टन्सीकडून ‘आम्ही तुम्हाला जॉबची ऑफर दिली होती. त्यामुळे पैसे परत मिळणार नाहीत,’ असे सांगण्यात येते आणि अटी मान्य असणाऱ्या पत्राचा दाखला देण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थी भीतीपोटी तक्रार करीत नाहीत. त्यामुळे आशेने नोकरी शोधणाऱ्या विद्यार्थ्यांचे आर्थिक शोषणच होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज