अ‍ॅपशहर

‘कास’चे उत्पन्न सत्तर लाखांवर

जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम परतीच्या पावसाबरोबरच संपल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे. यंदा फुलांच्या अवघ्या चाळीस दिवसांच्या हंगामातून संयुक्त वन व्यवस्थापन समितीला तब्बल सत्तर लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यंदा हंगामात ८० हजार पर्यटकांनी पठाराला भेट दिली.

Maharashtra Times 26 Oct 2017, 4:16 am
हंगाम संपल्याचे जाहीर; ८० हजार पर्यटकांनी दिली भेट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kaas plateau season ends this year
‘कास’चे उत्पन्न सत्तर लाखांवर


म. टा. प्रतिनिधी, पुणे

जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम परतीच्या पावसाबरोबरच संपल्याचे वन विभागाने जाहीर केले आहे. यंदा फुलांच्या अवघ्या चाळीस दिवसांच्या हंगामातून संयुक्त वन व्यवस्थापन समितीला तब्बल सत्तर लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. यंदा हंगामात ८० हजार पर्यटकांनी पठाराला भेट दिली.
पावसाचा जोर ओसरल्यानंतर कास पठार बहरण्यास सुरुवात होते. जुलै अखेरीस पहिल्या टप्प्यातील फुले येतात आणि ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पठार फुलांनी भरून जाते. साधारणतः दीड महिना संपूर्ण पठारावर रंगबिरंगी फुलांचे ताटवे बघायला मिळतात. कास पठाराला ‘युनेस्को’ने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिल्यापासून पठारावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. या गर्दीचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी वन विभागाने गेल्या चार वर्षांपासून पर्यटकांकडून उपद्रव शुल्क आकारण्यास सुरुवात केली.
यंदा वन विभागाने एक सप्टेंबरपासून कास पठार पर्यटकांसाठी खुले करून उपद्रव शुल्क आकारणीस सुरुवात केली. मात्र फुलांच्या हंगामादरम्यान अनेक वेळा मुसळधार पाऊस पडल्याने फुलांच्या हंगामावर परिणाम होऊन चाळीस दिवसच फुले पाहता आली. पण वन विभागाने जाहीर केलेल्या नियमावलीची यंदा परिणामकारक अंमलबजावणी झाल्याचे पाहण्यास मिळाले. ऑनलाइन प्रवेश शुल्काला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या बुकिंगमधून समितीच्या खात्यात ३२ लाख रुपये रक्कम जमा झाली. एकूण ७० लाख रुपये शुल्क गोळा झाले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंबाळे यांनी दिली.
सुट्टीच्या दिवशी तीन हजार पर्यटकांची नोंदणी झाली की, आम्ही ऑनलाइन बुकिंग बंद करीत होतो. त्यामुळे लोकांनी गैरसोय टाळण्यासाठी आठवड्यातील इतर दिवशी हजेरी लावली. पठरावर गाड्या लावल्या जाऊ नयेत, यासाठी पार्किंगची सोय दूर केली होती. तेथून पठारावर जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली. पर्यटकांचे चांगले सहकार्य मिळाले. कामाच्या विभागणीच्या दृष्टीने आम्ही गावकऱ्यांच्या सहभागातून विविध समित्या नेमल्यामुळे नियोजन चांगले झाले, असे डोंबाळे यांनी सांगितले.

गावकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे
कास पठाराची सविस्तर माहिती पर्यटकांना देण्यासाठी आम्ही गाइड नेमले होते. पार्किंगपासून गाड्या ठेवल्याने पठारावर गर्दी झाली नाही. पठार सुरक्षित राहिले तर आपल्याला रोजगार मिळणार, ही जाणीव गावकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे पर्यटकांना शिस्त लावणे आणि नियोजनात त्यांचे चांगले सहकार्य मिळाले, असेही डोंबाळे यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज