अ‍ॅपशहर

कोथरूडमध्ये थरार

कोथरूड परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या कारचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशीचा प्रयत्न केला. पण, कारमधील व्यक्तीने थेट पोलिसांवर पिस्तुल रोखत पोलिसांच्या अंगावर कार घातली.

Maharashtra Times 26 Apr 2016, 3:00 am
पोलिसावर रोखले पिस्तुल म. टा. प्रतिनिधी, पुणे एखाद्या चित्रपटात शोभावा असा थरार सोमवारी पहाटे कोथरूड परिसरात घडला. कोथरूड परिसरात संशयास्पद फिरणाऱ्या कारचा पाठलाग करून पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशीचा प्रयत्न केला. पण, कारमधील व्यक्तीने थेट पोलिसांवर पिस्तुल रोखत पोलिसांच्या अंगावर कार घातली. फौजदाराने स्वसंरक्षणासाठी स्वतःच्या पिस्तुलातून कारवर एक गोळी झाडली. मात्र, कारमधील संशियत पळून जाण्यात यशस्वी झाले असून पोलिसांना संशयित कार मिळाली आहे. या घटनेत एक पोलिस कर्मचारी जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिस उपनिरीक्षक प्रेम रामचंद्र वाघमारे (वय ३५, रा. एमआटी कॉलेज रोड, कोथरूड) यांनी तक्रार दिली आहे. या घटनेत पोलिस नाईक संजय केदारी हे जखमी आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फौजदार वाघमारे हे पोलिस कर्मचारी केदारी व आपटे यांच्यासोबत रविवारी रात्री कोथरूड परिसरात ‘नाइट राऊंड’ करत होते. पहाटेच्या चारच्या सुमारास त्यांना नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून एक काळ्या रंगाची सँट्रो कार संशयास्पद रीतीने वारजे किंवा कोथरूडकडे जात आहे. वायरलेसवरून माहिती मिळाल्यानंतर वाघमारे हे त्वरित चांदणी चौकाच्या दिशेने निघाले. चांदणी चौकाजवळील जैन लोहिया आयटी पार्कजवळ त्यांना सांगितलेल्या वर्णनाची संशयास्पद कार डेक्कनच्या दिशेने भरधाव येत असल्याचे दिसले. त्यांनी त्या कारचा पाठलाग सुरू केला. तसेच, कारची माहिती इतर बीट मार्शलला दिली. कार किनारा हॉटेलपासून म्हतोबानगरच्या दिशेने वळून भरधाव गेली. त्यानंतर वाघमारे यांनी त्यांची पोलिस व्हॅन शिवतीर्थ नगरच्या कमानीतून सुतारदराच्या दिशेने नेली. त्या वेळी शिवतीर्थ नगरमधील माथवड प्रांगण या इमारतीसमोर ही कार थांबलेली दिसली. वाघमारे आणि शिपाई आपटे हे कारच्या जवळ गेले. त्यांनी कारमधील दोन व्यक्तींना खाली उतरण्याची सूचना केली. त्या वेळी चालकाच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीजवळ पोलिसांना पिस्तुलासारखे हत्यार दिसले. कारच्या चालकाने खाली न उतरता कार सुरू करून पोलिस कर्मचारी केदारी यांच्या अंगावर घातली. त्यामुळे ते बाजूला पडले. कारमधील दुसऱ्या व्यक्तीने पोलिसांवर पिस्तुल रोखत ‘साइड में हो जा, नहीं तू तुझे भी मार डालेंगे’ अशी धमकी दिली. त्याचवेळी कारचालकाने कार सुरू करून वाघमारे व आपटे यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाघमारे यांनी स्व-संरक्षणार्थ त्यांच्याजवळील पिस्तुलीतून कारच्या दिशेने एक गोळी झाडली. मात्र, कारचालक पळून गेले. बीट मार्शलनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला. तर, वाघमारे यांनी जखमी कर्मचारी केदारी यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना गोपीनाथनगर येथील टेकडीजवळ ही कार आढळून आली. यामध्ये कारचे टायर फुटल्याचे आढळून आले. संशयास्पद कारचा क्रमांक एमएच ०४ एवाय ५७५७ असा असून ती ठाणे येथील आहे. ती मारुती बलभीम जाधव (रा. भिवंडी) या व्यक्तीच्या नावावर आहे. या कारमध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. या प्रकरणी अधिक तपास ससुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kothrud
कोथरूडमध्ये थरार


सीसीटीव्ही फुटेज ताब्यात कार फिरलेल्या रस्त्यावरील तसेच घटना घडली त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या फुटेजवरून आरोपींचा शोध घेतला जात आहे. तसेच, मोटारीची माहिती काढून आरोपींना पकडण्यासाठी कोथरूड पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज