अ‍ॅपशहर

विशेष मोहिमेद्वारे अजगर संवर्धन

तस्करी आणि विविध कारणांमुळे संकटात सापडलेल्या अजगरांच्या संवर्धनासाठी ‘लिव्हिंग विथ पायथन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वन्यजीव अभ्यासक निर्मल कुलकर्णी आणि त्यांच्या टीमची ही कल्पना असून, त्या अंतर्गत देशभरातील विविध जंगलांमध्ये आणि रहिवासी क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या अजगरांच्या माहितीच्या संकलनास सुरुवात झाली आहे.

Maharashtra Times 14 Jan 2017, 3:32 am
निर्मल कुलकर्णी यांचा उपक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम living with python
विशेष मोहिमेद्वारे अजगर संवर्धन


म. टा. प्रतिनिधी, पुणे

तस्करी आणि विविध कारणांमुळे संकटात सापडलेल्या अजगरांच्या संवर्धनासाठी ‘लिव्हिंग विथ पायथन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. वन्यजीव अभ्यासक निर्मल कुलकर्णी आणि त्यांच्या टीमची ही कल्पना असून, त्या अंतर्गत देशभरातील विविध जंगलांमध्ये आणि रहिवासी क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या अजगरांच्या माहितीच्या संकलनास सुरुवात झाली आहे.

‘लिव्हिंग विथ पायथन’ या उपक्रमातून अजगरांबद्दल जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. सध्या इंडियन रॉक पायथन (अजगर), बर्मिस पायथन आणि रेटिक्युलेटेड पायथन असे तीन प्रकारचे अजगर भारतात आढळतात. यातील रेटिक्युलेटेड पायथन हा जगातील सर्वांत मोठ्या सापांपैकी एक आहे. वन विभागाच्या निकषांनुसार, अजगर हा शेड्युल वन म्हणजेच संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीमध्ये आहे. तरीदेखील या प्राण्याबद्दल आतापर्यंत सखोल अभ्यास झालेला नव्हता. गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या किती प्रमाणात घटली, याचे शास्त्रीय निष्कर्ष आपल्याकडे उपलब्ध नाहीत. या धर्तीवर देशभरातील अजगरांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ‘लिव्हिंग विथ पायथन’ हा उपक्रम राबवण्यात येतो आहे.

‘अजगर वनक्षेत्राबरोबरच मानवी वस्त्यांजवळही आढळतात. अजगर हा परिस्थितीशी जुळवून घेणारा प्राणी असल्याने ऐन मुंबईत, चेंबूर भागातही अजगर सापडतात. वस्त्यांजवळ रहाणारे अजगर मुख्यतः घुशी, मांजराची पिल्ले आणि छोट्या कुत्र्यांवर जगतात. अजगरांवर आतापर्यंत सर्वंकष माहिती देणारा अभ्यास झालेला नाही. वन्यजीव अभ्यासक एस. भूपती यांनी अजगरांवर खूप काम केले होते; मात्र अलीकडेच त्यांचे अपघाती निधन झाले. वन्यजीव कायद्यानुसार अजगराला वाघाएवढे संरक्षण देणे आवश्यक आहे. नष्ट होत असलेले अधिवास आणि अंधश्रद्धेमुळे होणारी तस्करी या कारणांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अजगरांचे कातडीला तस्करीच्या बाजारपेठेत भरपूर मागणी आहे. रस्ता ओलांडताना गाडी खाली येऊनही मोठ्या प्रमाणात साप आणि अजगरांचा मृत्यू होतो आहे,’ अशी माहिती कुलकर्णी यांनी दिली.

फेसबुक पेजही

‘नवीन वर्षाचे औचित्य साधून उपक्रमाला नुकतीच सुरुवात झाली असून, सध्या वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते आहे. मी स्वतः विविध ठिकाणी जाऊन अजगरांची माहिती गोळा करतो आहे. या शिवाय वन्यजीव अभ्यासक, छायाचित्रकार, विविध संस्थांशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे. ‘लिव्हिंग विथ पायथन’ या नावाने फेसबुकवर आम्ही स्वतंत्र पेज सुरू केले असून, त्यावर देशाच्या कानाकोपऱ्यातून अजगरांबद्दलच्या नोंदी आणि फोटो येण्यास सुरुवात झाली आहे,’ असे कुलकर्णी यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज