अ‍ॅपशहर

राखी विक्रीला अल्प प्रतिसाद

लॉकडाउन, वाहतूक ठप्प आणि रोज दुकाने उघडण्यास मनाई या कारणांचा फटका राखी व्यवसायाला बसला आहे. लॉकडाउनच्या काळातही मोठ्या संख्येने तयार झालेल्या राख्या लॉकडाउनमुळे पडून आहेत.

महाराष्ट्र टाइम्स 28 Jul 2020, 6:45 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rakhi


लॉकडाउन, वाहतूक ठप्प आणि रोज दुकाने उघडण्यास मनाई या कारणांचा फटका राखी व्यवसायाला बसला आहे. लॉकडाउनच्या काळातही मोठ्या संख्येने तयार झालेल्या राख्या लॉकडाउनमुळे पडून आहेत.

पुण्यातील दहा दिवसांचा लॉकडाउन, तसेच विविध जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन लागू असल्याने घाऊक बाजारात राख्यांना उठाव नाही;‌ तसेच किरकोळ खरेदी-विक्रीचे प्रमाण घटले आहे. दर वर्षीच्या तुलनेत केवळ दहा-वीस टक्के व्यवसाय होत असल्याने व्यावसायिक आणि कामगार यांना फटका बसला आहे.

भावा-बहिणीच्या प्रेमाचा राखीपौर्णिमा सण सात दिवसांवर आला, तरी घाऊक बाजारातील माल किरकोळ बाजारात पोहचलेला नाही. ज्या दुकानांमध्ये राख्या उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी ग्राहकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसून येत आहे. राख्यांच्या निर्मितीमध्ये गुंतलेल्या लाखो रुपयांचा परतावा कसा मिळणार, या काळजीने व्यावसायिक त्रस्त आहेत.

'मार्च महिन्यापासून असलेल्या लॉकडाउनच्या आणि त्याआधीच्या दिवसांत राख्यांची निर्मिती झाली. मात्र, वाहतुकीची सोय नसल्याने पुण्यातील घाऊक राखी बाजारातील माल शहरात, जिल्ह्यात, इतर जिल्ह्यात, इतर राज्यांत, तसेच परदेशात पाठवता आला नाही. त्यामुळे लाखो राख्या पडून आहेत. शहरातील दुकानांमध्ये राख्यांची विक्री सुरू झाली असली, तरी त्यास प्रतिसाद मिळालेला नाही,' असे भावना मांगीलाल छाजेड यांनी सांगितले. भावना यांचा रास्ता पेठ आणि गोपाळ कृष्ण गोखले चौकात राख्यांचा पिढीजात व्यवसाय आहे.

पुण्यातील सर्वांत जुने 'संतोष रक्षाबंधन'चे संतोष बोरा म्हणाले, 'घाऊक विक्रीचा हंगाम लॉकडाउनमुळे वाया गेला आहे. बाहेरगावहून होणारी खरेदी होऊ शकली नाही. ग्राहकांना दुकानात येणे शक्य नसेल, तर कुरियर व पोस्ट सेवेद्वारे राखी पाठवण्याची व्यवस्था आम्ही केली आहे. किरकोळ बाजारात अद्याप प्रतिसाद नसून, पुढील चार दिवसांत राख्यांची खरेदी- विक्री होण्याची आशा आहे.'

पारंपरिक गोंड्या, उडी, मोती, कार्टून, प्रकाशाने चमचमणाऱ्या अशा दोन ते पंधरा हजार रुपयांपर्यंतच्या राख्या उपलब्ध आहेत; तसेच फॅन्सी, चंदन, सोने आणि चांदीच्या राख्यांमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले.


फ्रेंडशिप बँडला मागणी नाही

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. कॉलेज बंद असल्याने फ्रेंडशिप डे साजरा होण्याची शक्यता धूसर आहे. फ्रेंडशिप बँडला मागणी नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मालवाहतुकीसाठी आता दुप्पट किंवा तिप्पट दर आकारला जात आहे. चिनी साहित्याचे प्रमाण घटले, तरी स्थानिकांना त्याचा फायदा नाही. रस्त्यावर फारशी वर्दळ नसल्याने विक्री होत नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज