अ‍ॅपशहर

शिक्षकांचीही अॅप्टिट्यूड टेस्ट

राज्यातील शिक्षणसेवक पदांवर काम करण्यासाठी भावी शिक्षकांना ‘टीईटी’सोबतच आता अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (अॅप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स) उत्तीर्ण व्हावी लागणार आहे.

Maharashtra Times 27 Oct 2017, 3:00 am
शिक्षणसेवक भरतीसाठी आता आणखी एक चाचणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra government announced aptitude and intelligence test for teachers
शिक्षकांचीही अॅप्टिट्यूड टेस्ट


म. टा. प्रतिनिधी, पुणे
राज्यातील शिक्षणसेवक पदांवर काम करण्यासाठी भावी शिक्षकांना ‘टीईटी’सोबतच आता अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (अॅप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स) उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. राज्यात ही चाचणी ऑनलाइन पद्धतीने १२ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी इच्छुकांना दोन नोव्हेंबरपासून अर्ज करता येणार आहेत. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काही महिन्यांपूर्वी या चाचणीची घोषणा केली होती.

राज्यातील प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षणसेवक भरती आता अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीद्वारे होणार आहे. त्यामुळे शिक्षक म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना ही चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. यापूर्वी शिक्षकांची भरती ही शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्यांधून व्हायची. आता शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी टीईटीसोबतच अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी द्यावी लागणार आहे. राज्यात ही चाचणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे होणार आहे, असे परिषेदेतर्फे सांगण्यात आले आहे.

परीक्षार्थ्यांना या चाचणीसाठी www.mahapariksha.co.in या वेबसाइटहून २ ते २२ नोव्हेंबरपर्यत ऑनलाइन अर्ज करून शुल्क भरायचे आहे. परीक्षार्थ्यांना दहावी, बारावी, डीटीएड, बीएड, पदवी, पदव्युत्तर आदी शैक्षणिक तसेच राखीव, दिव्यांग प्रवर्गातील योग्य माहिती भरायची आहे. अर्जाद्वारे पात्र ठरणाऱ्या परीक्षार्थ्यांना २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. ऑनलाइन परीक्षा ही १२ ते २१ डिसेंबर दरम्यान प्रत्येक दिवशी तीन बॅचमध्ये होणार आहे. परीक्षार्थ्यांना अधिक माहिती वेबसाइटहून मिळेल अथवा त्यांना १८००-३०००-१६५६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधता येईल.

दोन परीक्षांचे दडपण

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी टीईटी परीक्षा घेण्यात येते. आता राज्य सरकारने शिक्षण सेवक म्हणून भरती होण्यासाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचे ठरविले आहे. असे असताना राज्यात टीईटी परीक्षा बंद होण्याबाबत कोणत्याच प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे टीईटी परीक्षा होणारच आहे. या परीक्षेच्या सोबतीला भावी शिक्षकांना अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी द्यावी लागणार आहे. त्यामुळे भावी शिक्षकांच्या मानगुटीवर दोन परीक्षा उत्तीर्ण होण्याचे दडपण राहणार आहे.

शुल्क भरणाही ऑनलाइन

अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी अर्ज करताना इच्छुकांना चाचणीसाठी शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. या पद्धतीमध्ये चलनाद्वारे शुल्क भरता येणार नाही. त्यामुळे इच्छुकांना नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्डाद्वारेच शुल्क भरावे लागणार आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज