अ‍ॅपशहर

मुळा-मुठेतून आता जलप्रवास?

शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी नदीतून विनाअडथळा प्रवास करता आला तर...? पुणे शहरातील मुळा-मुठा नद्यांमधून जलमार्ग सुरू करण्यासाठी राज्य सरकारने अनुकूलता दर्शवली असून, केंद्रीय जलमार्ग प्रकल्पांमध्ये पुण्यातील नद्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

सुनीत भावे | Maharashtra Times 18 Dec 2017, 3:00 am
मुळा-मुठेतून आता जलप्रवास?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mula mutha pune
मुळा-मुठेतून आता जलप्रवास?


म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात ठिकठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीत अडकण्याऐवजी नदीतून विनाअडथळा प्रवास करता आला तर...? पुणे शहरातील मुळा-मुठा नद्यांमधून जलमार्ग सुरू करण्यासाठी राज्य सरकारने अनुकूलता दर्शवली असून, केंद्रीय जलमार्ग प्रकल्पांमध्ये पुण्यातील नद्यांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी राज्यामार्फत हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्याची माहिती दिली. त्याविषयी, अंतिम निर्णय लवकरच केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यामार्फत घेतला जाण्याची शक्यता असल्याचे संकेत शिरोळे यांनी दिले. काही महिन्यांपूर्वी शहरातील एका जाहीर कार्यक्रमात गडकरी यांनीच नद्यांमधून जलवाहतूक सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
‘केंद्रीय मंत्री गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार राष्ट्रीय जलमार्ग प्रकल्पात पुण्यातील नद्यांचा समावेश करण्याचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली असून, आता केंद्राच्या योजनेत त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न असेल,’ असा दावा शिरोळे यांनी केला.
केंद्र सरकारने शहरासाठी जाहीर केलेल्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यातूनच, मेट्रो प्रकल्प मार्गी लागला असून, आगामी काही दिवसांमध्ये नदीसुधार प्रकल्प आणि पुरंदर येथील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल (एफओबी) उभारण्यात येत असून, त्यासाठी कमी पडणारा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
..................
भाजपमध्ये कोणतेही गट-तट नाहीत
पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असली, तरी काही योजनांच्या अंमलबजावणीवरून राज्यसभेचे सहयोगी खासदार संजय काकडे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी नगरसेवकांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर खासदार शिरोळे यांच्याकडे विचारणा केली असता, भाजपमध्ये कोणतेही गट-तट नाहीत, असा खुलासा त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज