अ‍ॅपशहर

डुबेरगडची सप्तश्रुंगी माता

वणीची सप्तश्रुंगी माता हे महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ समजले जाते. ‘अठराभुजा सप्तश्रुंग रूप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आदिशक्तीची प्रतिकृती नाशिक जिल्ह्यातल्याच डुबेरगड (ता. सिन्नर) इथे पाहता येते. जगदंबेच्या या आवेशपूर्ण अशा मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रात पंचक्रोशीसह राज्याच्या विविध भागातले भाविक मोठ्या संख्येने डुबेरगडाला भेट देतात.

प्रसाद पवार | Maharashtra Times 26 Sep 2017, 3:00 am
पुणे : वणीची सप्तश्रुंगी माता हे महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ समजले जाते. ‘अठराभुजा सप्तश्रुंग रूप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आदिशक्तीची प्रतिकृती नाशिक जिल्ह्यातल्याच डुबेरगड (ता. सिन्नर) इथे पाहता येते. जगदंबेच्या या आवेशपूर्ण अशा मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी नवरात्रात पंचक्रोशीसह राज्याच्या विविध भागातले भाविक मोठ्या संख्येने डुबेरगडाला भेट देतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम navratri column pune
डुबेरगडची सप्तश्रुंगी माता


नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरपासून सात किलोमीटर अंतरावर डेबेरे हे गाव आहे. विशेष म्हणजे स्वराज्याचे पराक्रमी वीर थोरले बाजीराव पेशवे यांचे हे जन्मगाव. गावातून अर्ध्या तासातच आपण गडावर पोहोचू शकतो. गावामागे एखाद्या रक्षकर्त्यासारखा डुबेरगड उभा असून गडावर देवीचे मंदिर उभे आहे. या पुरातन मंदिराचा गावकऱ्यांनी जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोर दीपमाळ असून परिसरात पाण्याच्या टाक्या, कोरडा तलाव; तसेच काही समाधीसदृश अवशेष दिसून येतात. गडावरून सिन्नरसह औंढा आणि पट्टा हे गडही दिसतात.

रंगरंगोटी केलेल्या मंदिरात देवीची ही सुंदर मूर्ती आहे. नवरात्रीमध्ये दररोज पूजाअर्चा, नैवेद्य आणि एरवीही देवीची नित्यनेमाने पूजा होते. सप्तश्रुंगी मातेचे स्थान डुबेरगडावर कसे काय, असा प्रश्न पडत असतानाच आपण तिच्या दर्शनात रमून जातो. वणीच्या जगदंबेसारखेच अठराभुजा सप्तश्रुंग रूप आपल्याला खिळवून ठेवते. देवीच्या मुकुटावर कोरीव चंद्रकोर आणि पाच फण्यांच्या नागाची आकृती दिसते. कानात कर्णफुलेही कोरलेली असून पूजाअर्चा आणि सजावट केल्यावर देवीची ही मूर्ती आणखी झळाळून उठते. काहीशा उपेक्षित अशा या ठिकाणाला भेट देताना एक वेगळीच मनःशांती मिळते. गावातल्या बर्वे यांच्या वाड्याला भेट देऊन थोरल्या बाजीरावांचे जन्मस्थळ नक्की पाहावे. डुबेरगडासह सोनगड, आडगड या अपरिचित गडांची भ्रमंतीही करता येईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज