अ‍ॅपशहर

नवीन विमानतळ राजगुरूनगर परिसरात

पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी खेड तालुक्यातील राजगुरूनगर परिसरातील जागा निश्चित करण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विमानतळाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचे पथक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे.

Maharashtra Times 24 Aug 2016, 10:55 am
एअरपोर्ट ऑथोरिटीचे पथक सप्टेंबरमध्ये येणार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new airport at chakan
नवीन विमानतळ राजगुरूनगर परिसरात


म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी खेड तालुक्यातील राजगुरूनगर परिसरातील जागा निश्चित करण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विमानतळाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करण्यासाठी एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचे पथक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे.

पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा नऊ वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. परंतु, या विमानतळाच्या जागेला अद्याप मुहूर्त लागलेला नाही. राज्यातील विमानतळांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीनंतर राजगुरूनगर परिसरात नवीन विमानतळ होणार असल्याचे त्यांनी ट्विटवर घोषित केले. तसेच, विमानतळाच्या या जागेची पाहणी करण्यासाठी एअरपोर्ट ऑथोरिटीचे पथक येणार असल्याचेही स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी चाकणमध्ये अमेरिकन कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत जून महिन्यात राउंड टेबल मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी एक महिन्यात विमानतळाची जागा निश्चित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. ही मीटिंग होऊन दोन महिने झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी राजगुरूनगर परिसरात विमानतळ होणार असल्याचे घोषित केले आहे. मात्र, राजगुरूनगरजवळ नेमक्या कोणत्या गावांमध्ये विमानतळ होणार हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळासाठी खेड तालुक्यातील तीन-चार जागांचे पर्याय आहेत. विमानतळासाठी सुरुवातीला चाकणची निवड करण्यात आली होती. परंतु, या जागेला स्थानिक शेतकरी व लोकप्रतिनिधींनी विरोध केला. त्यामुळे विमानतळ येथून पाइटकडे नेण्यात आला. त्यानंतर खेडच्या ‘सेझ’च्या जमिनीची पाहणी विमानतळ उभारणीसाठी झाली. सेझसह निमगाव, दावडी, केंदूर व कन्हेरसर या चार गावांची जागा त्यासाठी निश्चित केली गेली. या जागेलाही शेतकऱ्यांकडून विरोध झाला. या विरोधामुळे खेडमधीलच कोये-पाइट-केंदूर-पाबळ, रौंदळवाडी येथील जमिनीचा प्रस्ताव करण्यात आला. एअरपोर्ट ऑथोरिटीने विमानतळासाठी या जागेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत पुण्याच्या विमानतळासाठी जागा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, या जागांच्या पाहणीसाठी एअरपोर्ट ऑथोरिटीचे पथक येणार आहे. हे पथक सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जागांची पाहणी करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.


शिर्डीतून १ नोव्हेंबरपासून टेकऑफ

शिर्डी येथील विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शिर्डी विमानतळाच्या संरक्षण भिंतीला स्थानिक रहिवाशांनी विरोध केला होता. हा विरोध दूर करून संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या १ नोव्हेंबरपासून या विमानतळावरून विमानांचे टेकऑफ होणार आहे. शिर्डीच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता आहे. त्यासंबंधीच्या काही तांत्रिक बाबींना अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे सद्यस्थितीत हा विमानतळ देशांतर्गत (डोमेस्टिक) विमान सेवेसाठी वापरला जाणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज