अ‍ॅपशहर

पुणेकरांसाठी गुडन्यूज! आता घरबसल्या काढता येणार पीएमपीचे तिकीट, अशा असतील सुविधा

Pune News : आता पुणेकरांना घरबसल्या पीएमपीचे तिकीट काढता येणं शक्य आहे. पीएमपीच्या नवीन वेबसाइटचे काम अंतिम टप्प्यात आहे. या वेबसाइटचा काय होणार फायदा जाणून घ्या...

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Apr 2023, 12:18 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) नवीन वेबसाइट आणि मोबाइल अॅप विकसित करण्यात येत आहे. या नवीन वेबसाइटवरून प्रवाशांना घरबसल्या अथवा कोठूनही प्रवास मार्गावरील तिकीट ऑनलाइन स्वरूपात काढता येणार आहे. वेबसाइटवर मार्गाची माहिती सोप्या व सर्वांना समजेल, अशा पद्धतीने दिली जाणार आहे. त्यामुळे एखाद्या बसथांब्यावर पोहोचून किंवा बसमध्ये चढल्यावर तिकीट काढण्याऐवजी आधीच तिकीट काढून बस प्रवास करणे शक्य होणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pmpl pune cng
पुणेकरांसाठी गुडन्यूज! आता घरबसल्या काढता येणार पीएमपीचे तिकीट, असा असतील सुविधा


पीएमपीकडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत ३७९ मार्गांवर सेवा दिली जाते. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी प्रवाशांना चांगल्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांच्या दृष्टिकोनातून तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर दिला आहे. सध्याची पीएमपीची वेबसाइट प्रवाशांसाठी वापराच्या दृष्टीने अधिक सोयीची करण्यात येणार असून, त्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. यावर नवीन प्रवाशांना मार्ग कळावेत, यासाठी साध्या व सोप्या पद्धतीने माहिती दिली जाणार आहे. प्रवाशांना वेबसाइटवरून प्रवासासाठी ऑनलाइन तिकीट बुक करता येईल, अशी सोय केली जाणार आहे. प्रवाशांना प्रवासाच्या मार्गावर किती थांबे आहेत, ते कोणकोणते आहेत, त्या मार्गावर कोणत्या बस धावतात, त्यांच्या वेळा काय, अशी सर्व माहिती वेबसाइटवर दिसणार आहे.

अॅपचे काम सुरू

पीएमपीकडून नवीन वेबसाइटबरोबरच नव्याने मोबाइल अॅप विकसित केले जाणार आहे. या अॅपवर प्रवाशांना पीएमपीची सर्व माहिती मिळणार आहे. त्यात मार्ग, बसच्या वेळा, थांबे अशी सर्व माहिती उपलब्ध असेल. पहिल्या टप्प्यात वेबसाइटचे उद्घाटन केले जाईल. त्यानंतर अॅप प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. या अॅपद्वारे ऑनलाइन तिकीट काढण्याची सुविधा दिली जाणार जाणार आहे.

नवीन वेबसाइटवरील सुविधा

- शहरातील सर्व मार्ग व थांब्यांची माहिती
- प्रवास करायच्या मार्गाची माहिती शोधता येते
- प्रवाशांना ऑनलाइन तक्रार करण्याची सोय
- पीएमपीचे डेपो व त्यांचे प्रमुख यांची माहिती व संपर्क क्रमांक
- ३०० मार्गांचे नकाशे बेवसाइटवर पाहण्यास मिळणार
- मार्गावर धावत असलेल्या बसची माहिती


पीएमपीने प्रवास करताना कोणत्याही नव्या व्यक्तीला मार्गांची माहिती सहज व्हावी आणि कोठे प्रवास करायचा आहे, त्यासाठी कोणती बस सोयीची आहे, ती किती वेळाने येईल ही अद्ययावत माहिती मिळावी, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. वेबसाइट आणि ॲपमुळे पीएमपीचा प्रवास अधिक सुलभ होऊ शकेल.- ओमप्रकाश बकोरिया,अध्यक्ष, पीएमपी

महत्वाचे लेख