अ‍ॅपशहर

यंदा हेलिकॉप्टरमधून पादुका पंढरपूरला जाणार

करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मंदिर परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या कोणत्याही दिंड्यांना परवानगी देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jun 2020, 8:11 pm
पुणेः करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या ३० जून रोजी आषाढी एकादशीला बसद्वारे नेल्यास पादुकांच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन या पालख्या हेलिकॉप्टरने पंढरपूरला नेण्याची शिफारस जिल्हा प्रशासनाने केली आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना देण्यात आली असून, अंतिम निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ajit-pawar


करोनाचा प्रादूर्भाव असल्याने यंदा पायी वारी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी पालख्या या विमान, हेलिकॉप्टर किंवा बसेसद्वारे ३० जून रोजी पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमानापेक्षा हेलिकॉप्टरने पालख्या नेणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सुचविले आहे. बसेसने पालख्या नेल्यास भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हेलिकॉप्टरने पालख्या नेण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना माहिती देण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

वाचाः करोनामुक्तीकडे वाटचाल असलेल्या 'या' जिल्ह्यात पुन्हा आढळले रुग्ण

विमानाद्वारे पालख्या नेण्याचा मार्ग स्वीकारल्यास लोहगाव विमानतळावरून सोलापूर येथील विमानतळावर पालख्या न्याव्या लागणार आहेत. तेथून पंढरपूरला पालख्या नेण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा बसेसचा पर्याय निवडावा लागणार आहे. सोलापूर शहर ते पंढरपूर हे अंतर सुमारे ८० किलोमीटर आहे. त्यामुळे विमानाऐवजी हेलिकॉप्टरचा पर्याय स्वीकारणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे १२ जून रोजी, तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे १३ जून रोजी ५० भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळे झाले आहेत. पालख्यांचे प्रस्थान झाल्यानंतर यंदा श्री संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमध्ये मुक्कामी असून, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीमध्ये आहे. ३० जून रोजी पालख्या पंढरपूरला नेण्यात येणार आहेत.

आणखी वाचा: ...तर हरिभाऊ जावळेंचा जीव वाचला असता: खडसे

करोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरात करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मंदिर परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. पंढरपूरला जाणाऱ्या कोणत्याही दिंड्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडून दिंड्या आणि भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी जाण्यास प्रवास पास दिले जाणार नसल्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज