अ‍ॅपशहर

पॅरोल, फर्लोचे प्रमाण घटले

पॅरोल आणि फर्लो देण्याचे नियम कडक झाल्यानंतर या रजा देण्यात घट झाल्याचे आढळून आले आहे.

Shrikrishna kolhe | Maharashtra Times 13 Jan 2018, 3:00 am
चार वर्षात ४२८ कैदी पळाले, तर ४१३ कैदी पकडले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parole and furlough percentage decrease in maharashtra
पॅरोल, फर्लोचे प्रमाण घटले


पुणे : राज्यातील कारागृहामधून पॅरोल (अभिवचन) व फर्लोच्या (संचित) रजेवर सोडल्यानंतर गेल्या तीन वर्षात ४२८ कैदी पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी ३१३ कैद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. फरारी कैद्यांच्या विरोधात नवीन कलमांनुसार गुन्हे दाखल करून पोलिसांनी फरार कैद्यांना पकडले. तर, काही कैदी कारवाईच्या भीतीने स्वतः कारागृहात परत आले आहेत. पॅरोल आणि फर्लो देण्याचे नियम कडक झाल्यानंतर या रजा देण्यात घट झाल्याचे आढळून आले आहे.
कारागृह विभागाने राज्य ‘कारागृह सांख्यिकी अहवाल २०१६-१७’ हा नुकताच जाहीर केला आहे. त्यामध्ये पळून गेलेले कैदी, पॅरोल आणि फर्लोवर सोडलेल्यानंतर फरार झालेले, त्यानंतर पकडलेल्या कैद्यांची सविस्तर माहिती दिली आहे. राज्यातील कारागृहात असलेल्या कैद्यांना फर्लो आणि पॅरोल अशा दोन रजा दिल्या जातात. यातील फर्लो (संचित) ही कारागृह प्रशासन, तर पॅरोल (अभिवाचन) ही विभागीय आयुक्त कायार्लायाकडून दिली जाते. २०१५-१६मध्ये राज्यात २०५९ कैद्यांना संचित रजा, तर १५०५ कैद्यांना अभिवचन रजा मंजूर करण्यात आली होती. या वर्षी संचित रजेवर सोडलेले ५३ कैदी फरारी झाले, तर अभिवचन रजेवर सोडलेले ९० कैदी फरार झाले होते. २०१६-१७मध्ये २१०० कैद्यांना संचित, १०२८ कैद्यांना अभिवचन रजेवर सोडण्यात आले. त्यापैरी संचित रजेवर सोडलेले ३० कैदी आणि अभिवचन रजेवर सोडलेले ८४ कैदी फरारी झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत रजेवर सोडण्याचे व फरारी झालेल्या कैद्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
गेल्या दोन वर्षांत रजेवर सोडल्यानंतर फरारी झालेल्यांना पकडण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारागृह प्रशासाने आदेश करून रजेवर सोडल्यानंतर फरारी झालेल्या कैद्यांच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी रजेवर सोडल्यानंतर फरार झालेल्या कैद्यांवर भारतीय दंड संहिता कलम १२४ नुसार गुन्हा दाखल केला जात होता. हा गुन्हा अदखलपात्र स्वरूपाचा होता. पळून गेलेल्या कैद्याला पकडल्यानंतर त्याला पाचशे रुपये दंड आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत शिक्षा मिळत होती. त्यामुळे पळून गेलेल्या कैद्यांना पकडले गेले, तरी भीती राहत नव्हती. कारागृह प्रशासनाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तत्कालीन कारागृह प्रमुख मीरा बोरवणकर यांनी कलम २२४ नुसार फरार कैद्यांच्या विरोधात संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या कलमानुसार दाखल झालेला गुन्हा हा दखलपात्र असून त्याला दोन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे या कमलांनुसार राज्यात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. त्यामुळे गेल्या तीन वर्षांत संचित व अभिवचन रजेवर सोडलेले ४२८ कैदी पळून गेले होते. त्यापैकी ४१३ कैदी पकडण्यात आले आहेत. यामध्ये काही काही कैदी कारवाईच्या भीतीने स्वतः हून हजर झाले आहेत.

पोलिस उदासीन

कारागृहातून पॅरोल आणि फर्लोच्या रजेवर सोडल्यानंतर फरार झालेल्या कैद्यांना पकडण्यात पोलिस उदासीन असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांसमोर अगोदरच भरपूर कामे असतात. कारागृहातून सोडलेला कैदी फरार झाल्यानंतर त्याचा शोध पोलिस घेत नाहीत. शिक्षा झालेल्या कैद्यांना रजेवर सोडतना कारागृह विभागाकडून काळजी घेतली जात नसल्याचा आरोप पोलिसांकडून केला जातो. म्हणूनच पोलिसांकडून फरार कैद्यांना पकडण्यास प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे अद्याप पूर्वी पळून गेलेले अनेक कैदी फरार असल्याचे दिसून येते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज