अ‍ॅपशहर

फुले वाडा होणार अधिक आकर्षक

स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक समाजसुधारकांनी समाजसुधारणेची प्रेरणा मिळविलेले स्थान अशी ओळख असलेल्या महात्मा फुले वाड्याच्या ऐतिहासिक रूपाला धक्का न लावता नूतनीकरण करण्याच्या कामाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. २०१४ मध्ये या वाड्याच्या नूतनीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात २०१५ मध्ये कामास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये वाड्याच्या मू‍ळ वास्तूची डागडुजी करण्यात आली आहे. त्याबरोबरच मेघडंबरी, तुळशी वृदांवन, सीमा भिंत, भव्य प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण झाली आहेत. आता कामाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे.

Maharashtra Times 16 May 2017, 3:00 am
नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम लवकरच सुरू
महाराष्ट्र टाइम्स.कॉम phule wada will be renovated
फुले वाडा होणार अधिक आकर्षक

म. टा. प्रतिनिधी, पुणे
मूळ मातीचे बांधकाम असलेल्या, परंतु आता सिमेंटचा वापर करून पुन्हा जशाच्या तशा उभारलेल्या भिंती, मोडकळीस आलेले छताची दुरुस्ती, महात्मा फुले व सा‍वित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याभोवती आकर्षक मेघडंबरी, भव्य प्रवेशद्वाराची निर्मिती, वाड्याभोवतीची देखणी सीमा भिंत, तुळशी वृंदावन आणि विहिरीचा दगडी कठडा आणि बर्मा येथून आणलेल्या लाकडाचा आकर्षक वापर.., असे चित्र महात्मा फुले पेठेतील फुले वाड्यात पाहायला मिळत आहे. हा वाडा पूर्वी होता तसाच, पण अधिक अधिक आकर्षक दिसू लागला आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक समाजसुधारकांनी समाजसुधारणेची प्रेरणा मिळविलेले स्थान अशी ओळख असलेल्या महात्मा फुले वाड्याच्या ऐतिहासिक रूपाला धक्का न लावता नूतनीकरण करण्याच्या कामाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. २०१४ मध्ये या वाड्याच्या नूतनीकरणाच्या कामास मंजुरी देण्यात आली. प्रत्यक्षात २०१५ मध्ये कामास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यामध्ये वाड्याच्या मू‍ळ वास्तूची डागडुजी करण्यात आली आहे. त्याबरोबरच मेघडंबरी, तुळशी वृदांवन, सीमा भिंत, भव्य प्रवेशद्वार आदी कामे पूर्ण झाली आहेत. आता कामाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. त्यामध्ये महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यामागे म्युरल वॉल, मागील बाजूचे प्रवेश द्वार, वाड्याच्या परिसरातील फ्लोअरिंग, आकर्षक विद्युत रोषणाई ही कामे केली जाणार आहेत.
वाड्याच्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी माजी आमदार कमल ढोले-पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. वाड्याच्या नूतनीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू झाले आहे. तेव्हापासून आतापर्यंत केवळ २५ ते ३० टक्के काम झाले असल्याचे माजी आमदार कमल ढोले-पाटील यांचे म्हणणे आहे. सरकारच्या अनास्थेमुळेच हे काम रेंगळाले असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘फुले वाडा पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून, त्या भोवतीची जागा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात आहे. त्यामुळे या वाड्याचे नूतनीकरण करताना महापालिकेकडून सहकार्य होणे गरजेचे आहे,’ असेही त्या म्हणाल्या.
............
वाड्याच्या छतासाठी ‘बर्मा टीकवूड’चा वापर करण्यात आला आहे. या लाकडामध्ये तेलाचे प्रमाण अधिक असल्याने या लाकडाचे आयुष्य अधिक असते. या वाड्याच्या जुन्या बांधकामातील वासेही वाचविण्यात आले असून, त्यांचा पुनर्वापर करण्यात आला आहे.
- अर्चना देशमुख, आर्किटेक्ट, फुले वाडा नूतनीकरण योजना

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज