अ‍ॅपशहर

पोलिस आयुक्तालय कधी?

हिंसाचारांच्या घटनांनंतर मागणीने धरला पुन्हा जोर

रोहित आठवले | Maharashtra Times 18 Sep 2017, 3:00 am
पिंपरी : शहरात गेल्या आठवड्याभरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असावे, या मागणीने पुन्हा जोर पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी शहरात येऊन लवकरच पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय होणार असल्याची घोषणा केली. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या या तत्वतः घोषणेला मूर्त रूप कधी येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pimpri police commisionarate news
पोलिस आयुक्तालय कधी?


शहरातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांकडूनदेखील गेल्या अडीच वर्षांत केवळ आश्वासनेच दिली आहेत. आता या नेत्यांना पुन्हा एकदा त्यांच्या आश्वासनांची आठवण करून द्यायची वेळ आली आहे. २४ तासांच्या अंतरात दोन ठिकाणी गोळीबाराच्या घटना, माजी विरोधी पक्षनेत्यांच्या खुनाचा कथित कट, पोलिसाच्या शाळकरी मुलाचे अपहरण करून खून, दहशत माजविण्यासाठी चिंचवडमधील तोडफोड, अवैध गर्भपातास नकार देणाऱ्या डॉक्टरवर जीवघेणा हल्ला, पैशांच्या वादातून खुनी हल्ले, लिफ्टमध्ये चिमुरडीवर अत्याचार या घटना अवघ्या आठ-दहा दिवसांमध्ये घडलेल्या आहेत. तर, दोन चिमुरडींचे अपहरण करून बलात्कारानंतर खून करण्यात आले होते. या दोन्ही घटनांमधील चिमुरडींचे मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. यावरूनच शहरातील गुन्हेगारीने कळस गाठला आहे हे स्पष्ट होते. अशा घटना रोखण्यासाठी शहरात स्वतंत्र आयुक्तालय व्हावे, ही मागणीच नाही, तर गरज आहे. म्हणूनच भोसरीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय होईल ही केलेली घोषणा अस्तित्वात येण्याची अपेक्षा नागरिक करीत आहेत.

पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत असलेल्या पिंपरी-चिंचवडला कायम दुय्यम स्थान उच्चपदस्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. गुन्हे शाखेनेदेखील त्यांच्या सोयीनुसार विभागणीकरून पिंपरी-चिंचवडला ऑप्शनलाच टाकले आहे. शहर पोलिसांच्या एसीपी क्राइम १ या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांनी विभागणीनंतर पिंपरी-चिंचवडकडे येणेच टाळले आहे. तर अनेक वर्षांनी गुन्हेशाखेत सर्व पद भरल्यानंतरही अप्पर आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त यांच्याकडूनदेखील शहराकडे दुर्लक्ष केले जात आहे. किंबहुना पुणे शहराचा व्याप एवढा वाढला आहे, की या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना पिंपरी-चिंचवडकडे बघण्यास वेळच शिल्लक राहत नसल्याचे सांगितले जाते.

यापूर्वीच्या निवडणुकांद्वारे भाजपच्या पारड्यात एक आमदार आणि संपूर्ण महापालिका पिंपरी-चिंचवडकरांनी टाकली. त्यांच्या जोडीला राज्यमंत्री दर्जाचे पद, राज्यसभा खासदार, एक सहयोगी आमदार अशी फौजदेखील भाजपने प्रदेश पातळीवरून दिली. पण, या सर्वांकडून निव्वळ धूळफेकच केली गेल्याचे दिसून येते. प्रदेश पातळीवर आणि मुख्यमंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा सुरू आहे. पोलिस यंत्रणा सक्षम करण्यासाठी आयुक्तालयाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशा अनेक आश्वासनांनी या नेत्यांच्या सभा आणि प्रचार साहित्य गाजले. पण, अस्तित्वात अद्याप तरी काहीच आलेले नाही. दिवसाढवळ्या घडणारे गोळीबार, खून, बलात्कार हे सर्वसामान्यांना भोगावे लागत असल्याचे याचे कोणतेच सोयरसुतक नेत्यांना-विरोधीपक्षाला अथवा गृहमंत्रालयातील उच्चपदस्यांना आहे का, असा सवाल पिंपरी-चिंचवडकरांकडून उपस्थित केला जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज