म. टा. प्रतिनिधी, पुणे
सध्याच्या अटीतटीच्या परिस्थितीत नागरिकांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या मदतीला आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) चालक धावून आले आहेत. पीएमपीचे २५ चालक महापालिकेच्या व्हेइकल डेपोत कार्यरत राहणार आहेत.
महापालिकेच्या व्हेइकल डेपोकडून महापालिका हद्दीत रात्रंदिवस अत्यावश्यक सेवा चालू आहेत. या सेवा देताना प्रशासनापुढे चालकांची कमतरता भेडसावत आहे. अशा काळात सेवेत खंड पडू नये, यासाठी महापालिकेने पीएमपी प्रशासनाकडे २५ चालकांची मागणी केली आहे. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने त्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून प्रयत्न केले जात आहे. महापालिका प्रशासनाकडून शहरातील कचरा उचलणे, आरोग्य सेवकांची ने-आण करणे, अधिकाऱ्यांना सेवा देणे, शहरात विविध ठिकाणी व्यवस्था केलेल्या गरजूंना अन्नदान करणे आदी कामे केली जातात. व्हेइकल डेपोची नियमित कामे दोन शिफ्टमध्ये केली जात होती, ती आता तीन शिफ्टमध्ये केली जात आहेत. त्यामुळे त्यांना चालकांची कमतरता भासत आहे. त्यांना निकड असल्याने आणि पीएमपीचे बरेसचे चालक सध्या घरीच असल्याने, त्यांना तात्पुरते वर्ग करण्यात येत आहेत, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी दिली.
परिचारिकांना मोफत बस पास
'करोना'च्या पार्श्वभूमीवर शहराच्या विविध भागांत जाऊन सर्व्हे करणाऱ्या महापालिकेच्या १२८ परिचारिकांना दोन महिने मोफत बस पासची मागणी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी केली आहे. त्यानुसार त्यांना मोफत पास देण्यात येत आहेत.