म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
पोलिसांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाद्वारे सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे असलेल्या पोलिसांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर गरज भासल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने संबंधित पोलिसांची करोनाची चाचणी केली जाणार आहे. करोना चाचणी पोलिसांसाठी मोफत असून याचा खर्च पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालायकडून केला जाणार आहे.
सहायक पोलिस आयुक्त श्रीधर जाधव यांनी याबाबत माहिती दिली. पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. पोलिसांच्या तपासणीची व्यवस्था वाकड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र विभागात करण्यात आली आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी अडीच या कालावधीत ही तपासणी केली जात आहे. डॉ. संदीप सिंग, डॉ. आशुतोष श्रीवास्तव हे डॉक्टर तपासणी करणार आहेत. प्राथमिक तपासणीनंतर आवश्यकता भासल्यास संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची करोनाची चाचणी केली जाणार आहे. ज्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्याची कोरोनाची चाचणी केली जाईल, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात अथवा घरी क्वारंटाइन करण्यात येणार आहे.