अ‍ॅपशहर

ऐन पावसाळ्यात खोदला रस्ता

पावसाळ्यात रस्ते खोदई करण्यास परवानगी नसताना खासगी कंपन्यांनी दुसऱ्यांदा रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम केले आहे.

Maharashtra Times 18 Jul 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, हडपसर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम private company digged a road for cable work in hadapsar in rainy season
ऐन पावसाळ्यात खोदला रस्ता

पावसाळ्यात रस्ते खोदई करण्यास परवानगी नसताना खासगी कंपन्यांनी दुसऱ्यांदा रस्ते खोदून केबल टाकण्याचे काम केले आहे. पावसाळी लाइन टाकण्याच्या नावाखाली केबलचे काम करण्यात आल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागात नोबेल हॉस्पिटलशेजारी हा प्रकार घडला आहे.

रस्त्यातील खोदकामामुळे हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण, तसेच येथून जाणाऱ्या पादचाऱ्यांना त्रास होत आहे. त्यामुळे मगरपट्टा रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांच्या सुरक्षतेचा विचार न करता जेसीबीद्वारे रस्त्यात खोदकाम करणाऱ्या खासगी कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मगरपरपट्टा-मुंढवा रस्त्यावर नोबेल हॉस्पिटलशेजारी विनापरवाना जेसीबीद्वारे खोदकाम करून केबल टाकत असताना मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा शिल्लक उरली नव्हती. महापालिका पावसाळ्यात खोदकामाला परवानगी देत नाही. मागील महिन्यात विनापरवाना खोदकामाबाबत महापालिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी तक्रार करून या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनला पत्र देण्याशिवाय पुढे काही केले नाही. तसेच महापालिकेचे पैसे खर्च करून केबल लाइन काढून टाकण्यात आल्या होत्या. अशा परिस्थितीत खासगी कंपन्या स्वतःचे काम उरकून घेण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवत असल्याचे मगरपट्टाच्या खोदकामावरून दिसून आले आहे.

अधिकाऱ्यांचा दावा

केबल लाइन टाकण्याच्या कामाबाबत पथ विभागाचे उपअभियंता विश्वजित भंडारे म्हणाले, येथील काम पावसाळी लाइन टाकण्याचे काम आहे. आता केबल टाकत असतील, तर हे काम थांबवायला सांगतो. संबंधित काम पावसाळी लाइन विभागाचे आहे. त्यांना याबाबत माहिती देतो. त्यानंतर पावसाळी लाइन विभागाचे उपअभियंता प्रकाश कुंभार यांनी सांगितले की, ‘पावसाळी लाइन चार दिवसांपूर्वीच टाकली आहे. फक्त खोदलेल्या कामावर कॉक्रीट करणे बाकी आहे. आम्ही केबल लाइन टाकत नाही. याबाबत पथ विभागाला कळवतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज