अ‍ॅपशहर

खासगी वाहनवापर घटविण्यावर भर

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सक्षम व्हावी, यासाठी शहरातील रस्त्यांवर मोफत पार्किंगची सुविधा देऊ नये, अशी भूमिका महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतली आहे. खासगी वाहनवापर कमी व्हावा, यासाठी शहराचे चार विभाग करून वाहनचालकांकडून पार्किंग शुल्क वसूल करण्याचा विचार आयुक्तांनी मांडला आहे.

Maharashtra Times 31 Mar 2017, 4:07 am
वाहनचालकांकडून मोठे पार्किंग शुल्क आकारण्याची योजना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम private vehicles use declines suggested pmc commissioner
खासगी वाहनवापर घटविण्यावर भर


म. टा. प्रतिनिधी, पुणे

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिकाधिक सक्षम व्हावी, यासाठी शहरातील रस्त्यांवर मोफत पार्किंगची सुविधा देऊ नये, अशी भूमिका महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी घेतली आहे. खासगी वाहनवापर कमी व्हावा, यासाठी शहराचे चार विभाग करून वाहनचालकांकडून पार्किंग शुल्क वसूल करण्याचा विचार आयुक्तांनी मांडला आहे.
महत्वाच्या आणि रहदारीच्या रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग करणाऱ्यांकडून जादा शुल्क वसूल करण्याची गरज असून, भविष्यात या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. शहराचा झपाट्याने विस्तार होत असून, खासगी वाहनांचा वापर वाढला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असूनही खासगी वाहनांचा सर्रास वापर वाढत असल्याने जागोजागी वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक महत्वाच्या रस्त्यांवर सर्रासपणे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जाते त्यामुळे वाहतुकीला अडथळा होण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढविण्याची आवश्यकता आहे. पीएमपीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढल्यास उत्पन्नात तसेच सेवेच्या दर्जात वाढ होईल. पीएमपी सक्षम झाल्यानंतरच रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या कमी होईल, याची वाट न पाहता खासगी वाहनांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य द्यावे यासाठी शहरातील सर्वच रस्त्यांवर पार्किंग शुल्क आकारले पाहिजे. ज्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रहदारी असते, त्या रस्त्यांवर वाहने पार्किंग केल्यास वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क घेतले पाहिजे. शहरातील कोणत्याही महत्वाच्या रस्त्यावर मोफत पार्किंगची सुविधा देऊ नये अशी भूमिका घेणे गरजेचे आहे. रस्त्यांवर मोफत पार्किंग असल्याने नागरिक सर्रास रस्त्यांवर वाहने उभी करतात. पार्किंगसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याने दिवसभर रस्त्यांवर वाहने उभी केली जातात. त्यामुळे अनेक रस्त्यांवर वाह‌तुकीची कोंडी होते, असेही आयुक्त म्हणाले.

पार्किंग शुल्क ठरविण्याचे घटक
- वाहनाने वापरलेली जागा
- पार्किंगचा एकूण कालावधी
- गर्दीची आणि गर्दी नसलेली वेळ
- सुट्टीचा दिवस आणि अन्य दिवस
- वाहनतळावरील शुल्क कमी असावे.
- रस्त्यावरील पार्किंग शुल्क अधिक असावे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज