अ‍ॅपशहर

बिष्णोई टोळीकडून संतोष जाधवला पिस्तुले; तपासात समोर आली धक्कादायक माहिती

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवला कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा साथीदार विक्रम ब्रारने मध्य प्रदेशात दोन पिस्तुले आणि दारूगोळा आणण्यासाठी पाठविले होते.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 21 Jun 2022, 8:28 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवला कुख्यात लॉरेन्स बिष्णोईचा साथीदार विक्रम ब्रारने मध्य प्रदेशात दोन पिस्तुले आणि दारूगोळा आणण्यासाठी पाठविले होते. त्यापैकी एका पिस्तुलाचा वापर ओंकार बाणखेलेच्या खुनासाठी केल्याची कबुली संतोषने दिली आहे. हे पिस्तूल जप्त करण्यात आले असून, उर्वरित पिस्तूल आणि दारूगोळा हस्तगत करायचा आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी न्यायालयाला दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम santosh-jadhav


संतोष जाधवच्या टोळीतील सदस्यांकडून १३ पिस्तुले जप्त करण्यात आली असून, मध्य प्रदेशातील 'जॅक स्पॅरो'नामक व्यक्तीकडून ती मिळविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, असेही बोंबटकर यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर संतोष सुनील जाधव (वय २७, रा. पोखरी, आंबेगाव, सध्या रा. मंचर) आणि त्याला फरारी असताना आश्रय देणारे सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाल (वय १९, रा. नारायणगाव, जुन्नर), नवनाथ सुरेश सूर्यवंशी (वय २८, विखले, खटाव, सातारा, सध्या रा. भूज, गुजरात) आणि तेजस कैलास शिंदे (वय २२, रा. नारायणगाव, जुन्नर) यांना विशेष न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गेल्या वर्षी एक ऑगस्टला आंबेगावमधील एकलहरे गावात ओंकार बाणखेलेचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या प्रकरणात संतोष जाधवसह चौदा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मकोका) मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी संतोष आणि त्याच्या साथीदारांवर नारायणगाव पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओंकार बाणखेलेचा खून केल्यानंतर संतोषने देशात विविध ठिकाणी बिष्णोई टोळीच्या सदस्यांकडे वास्तव्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत. संतोषच्या टोळीतील साथीदारांचा शोध घेतला जात आहे. आरोपी नवनाथ सूर्यवंशी बाणखेलेच्या खुनाच्या घटनेवेळी पिंपरी-चिंचवड परिसरात वास्तव्यास होता. त्या दरम्यान तो संतोष व त्याच्या साथीदारांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. सिद्धेश कांबळे आणि तेजस शिंदे यांनी संतोषला फरारी असताना लपून राहण्यास मदत केली आहे. त्याबाबत तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

'काम झाले; साडेतीन लाख रुपये मिळाले'

सिद्धू मुसेवाला याची २९ मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर नवनाथ सूर्यवंशी याने एक जून रोजी सिद्धेश कांबळेला सिग्नल अॅपवर कॉल करून, 'काम झाले आहे, साडेतीन लाख रुपये मिळाले आहेत,' असे सांगून बँक खाते क्रमांक मागितला, तसेच 'आपण गुजरातमध्ये असून, संतोष पण इथे येणार आहे,' असे सांगितले. याशिवाय संतोष आणि त्याच्या मित्रांनी हरियाणातील अंबाला कँटोन्मेंट येथे पिस्तुलाचा धाक दाखवून लुटालूट केली होती, असे सिद्धेश कांबळे याने पोलिस तपासात सांगितले. त्यामुळे या तिघांनी दहशतीतून कमविलेल्या मालमत्तेचा पोलिस शोध घेत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज