अ‍ॅपशहर

पुण्यात ऑक्सिजन गरजू रुग्णांसाठी २५ रिक्षा अॅम्ब्युलन्स

ऑक्सिजनची तीव्र गरज भासणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना जवळच्या रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी ‘रिक्षा ॲम्ब्युलन्स’ हा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2021, 3:02 pm
पुणे : ऑक्सिजनची तीव्र गरज भासणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना जवळच्या रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी ‘रिक्षा ॲम्ब्युलन्स’ हा उपक्रम नुकताच सुरू करण्यात आला आहे. पुणेस्थित ‘स्वदेश सेवा फाऊंडेशन’ व ‘बघतोय रिक्षावाला फोरम’ या स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत ऑक्सिजन सिलेंडर व वैद्यकीय उपकरणांनी सज्ज २५ ऑटोरिक्षा ॲम्ब्युलन्सचा ताफा उपलब्ध करण्यात आला आहे. प्रारंभी या रिक्षा ॲम्ब्युलन्स पुणे शहर तसेच लगतचे मुळशी, मावळ तालुके, पिंपरी-चिंचवड, भोर, सांगली व अहमदनगर शहरातील रुग्णांना सेवा देतील. या उपक्रमाला दुबईस्थित उद्योजक आणि अल अदिल समूहाचे संस्थापक डॉ. धनंजय दातार यांनी अर्थसाह्य दिले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुण्यात गरजू रुग्णांसाठी २५ रिक्षा अॅम्ब्युलन्स


यासंदर्भात माहिती देताना या उपक्रमाच्या पुणे स्थित समन्वयक धनश्री पाटील म्हणाल्या, ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना विनाविलंब जवळच्या रुग्णालयांत दाखल करणे अत्यंत आवश्यक असते. बऱ्याचदा रुग्णाचे घर गल्लीबोळात असल्यास अरुंद रस्त्यामुळे रुग्णवाहिका घरांपर्यंत पोचणे अशक्य होते. ऑटोरिक्षाच्या आटोपशीर आकारामुळे ती अरुंद गल्लीबोळांतही सहजतेने नेता येते. अशी रिक्षा ऑक्सिजन सिलींडर व आवश्यक त्या वैद्यकीय उपकरणांनी सज्ज असेल.

या उपक्रमाला अर्थसाह्य पुरवणारे डॉ. धनंजय दातार म्हणाले की उत्तम समाजोपयोगी उपक्रमांच्या पाठीशी ‘अल अदील’ समूह नेहमीच उभा राहतो. कोविड साथीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पुण्यातील १५० हून अधिक स्वयंसेवकांच्या कार्याचा आम्ही अभिनव पद्धतीने गौरव केला होती. ‘रिक्षा ॲम्ब्युलन्स’सारख्या उपक्रमात वाटा उचलताना आम्हाला कृतकृत्य वाटत आहे. संपूर्ण समाज हा साथमुक्त होईपर्यंत आपल्याला काळजी घेणे भाग आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षा ॲम्ब्युलन्स रुग्णांसाठी नक्कीच प्राणदाता ठरतील, ही माझी खात्री आहे.

या उपक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांचा संघही सहभागी असणार आहे. हे डॉक्टर रुग्णांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा ॲम्ब्युलन्स चालकांच्या सतत संपर्कात राहतील. रुग्णाच्या नातलगांनी ९६५७२ ८९४११ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ‘रिक्षा ॲम्ब्युलन्स’ बोलवता येणार आहे. रुग्णाला घरापासून जवळच्या रुग्णालयात दाखल करेपर्यंत पूर्ण वेळ हे डॉक्टर रिक्षाचालकांना रुग्णाची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करत राहतील. ऑक्सिजन कसा द्यायचा, ऑक्सिजन फ्लो मीटर कसा हाताळायचा, पल्स ऑक्सिमीटरच्या साह्याने ऑक्सिजनची पातळी कशी मोजायची, रुग्णाच्या सुरक्षिततेची काळजी कशी घ्यायची यांचे पूर्ण प्रशिक्षण या चालकांना देण्यात आले आहे.

रिक्षा ॲम्ब्युलन्सचे भाडे न परवडणाऱ्या गरीब रुग्णांसाठी ही सेवा मोफत असेल. ज्यांना काही देणे शक्य आहे अशांना अल्प दरांत सेवा उपलब्ध असेल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज