अ‍ॅपशहर

भक्तांचा प्रवाहो चालिला

लोकांच्या गर्दीचा महापूर यावा, अशीच शनिवारची सायंकाळ होती. नजर जाईल तिथपर्यंत केवळ माणसांचे जथ्थेच्या जथ्थेच दिसत होते. ही ओढ होती.. गणरायाची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठवून घेण्याची... ही ओढ होती लाडक्या बाप्पापुढे नतमस्तक होण्याची... ही ओढ होती देखावे पाहण्यात रंगून जाण्याची आणि भरपेट पूजा करत रात्रभर आनंदात न्हाऊन जाण्याची...

Maharashtra Times 3 Sep 2017, 3:21 am
देखावे पाहण्यासाठी मध्यवस्तीत गर्दीचा महापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune citizens gathered for ganesh idol
भक्तांचा प्रवाहो चालिला


म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकांच्या गर्दीचा महापूर यावा, अशीच शनिवारची सायंकाळ होती. नजर जाईल तिथपर्यंत केवळ माणसांचे जथ्थेच्या जथ्थेच दिसत होते. ही ओढ होती.. गणरायाची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठवून घेण्याची... ही ओढ होती लाडक्या बाप्पापुढे नतमस्तक होण्याची... ही ओढ होती देखावे पाहण्यात रंगून जाण्याची आणि भरपेट पूजा करत रात्रभर आनंदात न्हाऊन जाण्याची...
शनिवारी सायंकाळी सर्व पेठा गजबजून गेल्या होत्या. गणपती आणि देखावे पाहायचे म्हटले की पावले आपोआप शहराच्या मध्यभागाकडे वळतात. सायंकाळचे सात वाजू लागले तसे उपनगरातून तसेच बाहेरगावहून आलेल्या गणेशभक्तांचे जथ्थे मध्यभागात दिसू लागले. मानाचे पाच गणपती म्हणजे पुण्याचे सांस्कृतिक वैभवच... दगडूशेठ गणपती म्हणजे अनेकांचे श्रद्धास्थान. मंडईची शारदा गजाननाची विलोभनीय मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू, तर भाऊ रंगारीची मूर्ती गणरायाच्या शक्तिस्थानाचे प्रतीक. अशा या मंडळांबरोबर शहरातील उत्सवाची परंपरा सांगणाऱ्या सर्व मंडळांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखाव्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याने गणपती पाहायला बाहेरगावहून आलेल्यांचे प्रमाण वाढले होते. या जोडीला शहर व उपनगरातील नागरिकांनी गर्दी केल्याने सायंकाळनंतर रस्ते फुलून गेले होते. सर्व प्रमुख रस्त्यांवर एक चैतन्य अनुभवण्यास येत होते.
गर्दीमुळे पेठांमधील वाहतूक ठप्प झाली होती. सर्व रस्ते केवळ पादचाऱ्यांनी व्यापल्याचे चित्र होते. शनिवारी ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी असल्याने रात्री बारापर्यंत देखावे सुरू होते. गणपती आणि देखावे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांची पेटपूजा करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला स्टॉल सज्ज होते. गणपतीचे दर्शन घ्यायचे, देखावे पाहायचे, मध्येच थोडी पेटपूजा करायची, फोटो काढायचे आणि पुन्हा चालू लागायचे असा कार्यक्रम रात्रभर सुरू होता. चित्रविचित्र मुखवटे, खेळणी असेही साहित्य असल्याने गर्दीत काही विचित्र चेहरेही लक्ष वेधून घेत होते. आराम करायला रविवार आहेच, अशा विचाराने गर्दी कमी होत नव्हती. रात्री बारानंतरही आवाज करत काही मंडळांनी देखावे सुरू ठेवले होते. रात्री दोनवाजेपर्यंत पेठांचा भाग गजबजून गेला होता. यंदाच्या गणेशोत्सवातील गर्दीचा महापूर शनिवारी अवतरला होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज