अ‍ॅपशहर

जवानांसाठी उभारणार ऑक्सिजन प्लांट

सियाचिनमधील पहिल्या प्रकल्पानंतर पुण्याच्या चिथडे दाम्पत्याने आता भारतीय सीमेवर अन्यत्र आणखी दोन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे.

Authored byप्रसाद पानसे | महाराष्ट्र टाइम्स 5 Jul 2021, 3:47 pm
पुणे : सियाचिनमधील पहिल्या प्रकल्पानंतर पुण्याच्या चिथडे दाम्पत्याने आता भारतीय सीमेवर अन्यत्र आणखी दोन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी स्वत:पासून सुरुवात केली असली, तरी त्यांना गरज आहे, समाजाच्या साथीची!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune couple has decided to install oxygen generation plant for soldiers in other two places
जवानांसाठी उभारणार ऑक्सिजन प्लांट


करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेकांना प्राण गमवावे लागले आणि ऑक्सिजनचे महत्त्व नव्याने सर्वांनाच कळून चुकले. आपल्यासाठी ही बाब नवी असली, तरी अतिउंचावरील दुर्गम भागात तैनात सैनिकांना दररोज ऑक्सिजनच्या कमतरतेविरोधातही लढावे लागते; म्हणूनच या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पाच्या उभारणीचा संकल्प चिथडे दाम्पत्याने केला आहे.

पुण्यातील 'सोल्जर्स इंडिपेडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन' ही योगेश चिथडे व त्यांच्या पत्नी सुमेधा फणसे-चिथडे यांची संस्था. त्यांच्या पुढाकाराने ऑक्टोबर २०१९मध्ये 'सियाचिन फिल्ड हॉस्पिटल' येथे पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभा राहिला. त्यासाठी सुमेधा यांनी स्वत:चे दागिने मोडून सव्वा लाखांचा निधी जमवला. 'महाराष्ट्र टाइम्स'ने त्यांचे हे कार्य सर्वांपुढे आणले आणि अनेक सर्वसामान्य नागरिकांनी ही मोहीम स्वत:ची मानून काम केले.

घरोघर वृत्तपत्र टाकणारी मुले, घरकामगार महिला, लहान मुलांनी पिगी बँकेतून दिलेला निधी, आठ वर्षांच्या मुलीने पिगी बँकेतून दिलेले सर्व पैसे, काही वीरपत्नींनी आपापले एक महिन्याचे निवृत्तीवेतनही या कामासाठी दिले; शिवाय काही कंपन्या, सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीतूनच हा भव्य प्रकल्प साकारला. आज हा प्रकल्प सैनिकांसह आजारी पडणारे पर्यटक व स्थानिक नागरिकांनाही उपयुक्त ठरत आहे. सुमारे ३० हजारहून अधिक व्यक्तींसाठी याचा वापर झाला असून, त्यातून काही सैनिकांचे प्राणही वाचले.

चिथडे दाम्पत्याच्या कामाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही घेतली. मुंबई दौऱ्यावर आले असताना मोदी यांनी चिथडे यांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून या प्रकल्पाची माहिती घेतली आणि त्यांची पाठ थोपटली. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनीही चिथडे यांना भेटीसाठी बोलवून त्यांचे कौतुक केले.

'सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्याने निधी जमवून आम्ही सियाचिन येथे पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभारला. मात्र, सर्वाधिक उंचीवर नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत कमी ऑक्सिजन उपलब्ध असतानाही स्वतःच्या जीवाची, स्वतःच्या कुटुंबाची चिंता न करता आपल्या सर्व देशवासीयांसाठी 'राष्ट्र प्रथम' भावाने सैनिक कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी अजून दोन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्याचा संकल्प आम्ही केला आहे. नेहमीप्रमाणे आम्ही आमचे आर्थिक योगदान देऊनच निधी संकलन सुरू केले आहे. पूर्वीप्रमाणेच समाजाची साथ मिळाली, तर देशाचे हे देणे सहज फेडता येईल,' असे सुमेधा व योगेश चिथडे यांनी सांगितले.

येथे माहिती उपलब्ध

'सिर्फ' ही नोंदणीकृत विश्वस्त संस्था असून, संस्थेला दिलेल्या देणगीवर प्राप्तिकरातून सवलत मिळू शकते. सध्या करोनामुळे लष्कराविषयी जागृती करणारे कार्यक्रम प्रत्यक्ष स्वरूपात घेता येत नसले, तरी ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रम घेऊन या प्रकल्पांसाठी निधी जमा करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असेही चिथडे यांनी नमूद केले.

या उपक्रमाविषयी https://sirf.org.in/ या वेबसाइटवर अधिक माहिती उपलब्ध आहे.

पवित्र भिक्षा अभियान

यंदा निधी संकलनासाठी सुमेधा चिथडे यांनी 'पवित्र भिक्षा अभियान' सुरू केले आहे. करोनाचे सर्व नियम पाळून दररोज फक्त १३ घरांत जाऊन, तेथे नागरिकांना या प्रकल्पाची माहिती त्या देणार आहेत. त्यातून मदतीचे आवाहन करणार आहेत. या उपक्रमालाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद पानसे
प्रसाद पानसे हे महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीत १३ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पत्रकारितेतील १४ वर्षांचा अनुभव आहे. पुणे शहर, पुणे महापालिका, नागरी समस्या, स्थानिक राजकारण, संरक्षण, बँकिंग, कॉर्पोरेट, शिक्षण आदी क्षेत्रांमधील बातमीदारीचा अनुभव.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज