अ‍ॅपशहर

खुनाचा कट उधळला

मुळशी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग वझरकर यांच्या खुनाचा कट उधळून लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

Maharashtra Times 10 Aug 2017, 3:00 am
नऊ जणांच्या टोळीला अटक; सहा पिस्तुले जप्त
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune crime branch foiled murder conspiracy in mulshi
खुनाचा कट उधळला


म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुळशी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग वझरकर यांच्या खुनाचा कट उधळून लावण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. मुख्य आरोपीसह खुनाची सुपारी घेतलेल्या नऊ जणांच्या टोळीला माण रस्त्यावरील लक्ष्मी पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून सहा पिस्तुले, २८ काडतुसे, पाच कोयते असा एकूण १२ लाख २६ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

उमेश रघुनाथ वाघुलकर (वय ३८, रा. माण, ता. मुळशी), योगेश भाऊ गुरव (वय ३२, रा. विकास मित्रमंडळ चौक, कर्वेनगर), योगेश अंकुश वेताळ (वय २३), विशाल नवनाथ वेताळ (वय २३), विशाल आनंदा कळसकर (वय १९, तिघे रा. रा. मलठण, ता. शिरूर), चंद्रकांत दोरसिंग थापा (वय ३५, रा. नामदेव लोंढे चाळ, कासारवाडी), फिरोज अयुब खान (वय ४०, रा. दळवीनगर, चिंचवड), अन्वर हसन मुलानी (वय ४०, रा. रावेतगाव), आकाश प्रकाश रेनुसे (वय २२, रा. पाबे, ता. वेल्हा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वाघुलकर हा या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने वझरकर यांना मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांनी दिली.

माण येथील लक्ष्मी पेट्रोलपंप लुटण्यासाठी काहीजण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक संजय निकम, सहायक निरीक्षक अन्सार शेख, विठ्ठल शेलार, उपनिरीक्षक दिनेश पाटील यांच्या पथकाने सापळा रचून या नऊ जणांना अटक केली. त्यांच्याकडून पाच पिस्तुल व एक रिव्हॉल्वर जप्त केले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. एका खुनाच्या गुन्ह्याचा कट तडीस नेण्यासाठी हा दरोडा टाकण्यात येणार असल्याचे समोर आले.

मुख्य आरोपी वाघुलकर आणि पंचायत समितीचे उपसभापती वझरकर या दोघांमध्ये राजकीय वैमनस्य आहे. त्यांच्यात अनेकदा मारामाऱ्या झाल्या आहेत. वझरकर यांचा बदला घेण्यासाठी वाघुलकरने खुनाचा कट रचला. तो तुरुंगात असताना त्याची शरद मोहोळ टोळीतील गुन्हेगार योगेश गुरव आणि थापा या दोघांची ओळख झाली. हे तिघेही बाहेर आल्यांनतर त्यांनी इतरांच्या मदतीने वझरकर यांच्या खुनाचा कट रचला. त्यासाठी आठ जणांना प्रत्येकी दोन लाख रुपये वाघुलकर देणार होता. हा पैसा उभा करण्यासाठी त्यांनी लक्ष्मी पेट्रोल पंपवार दरोडा टाकण्याची तयारी केली असल्याचे तपासात कबुल केले. आरोपी वाघुलकर याने नाशिक येथून चार पिस्तुले आणली आहेत; तर, गुरव याच्याकडे दोन पिस्तुले होती. त्याचा वापर गुन्ह्यात करणार होते.

पॅरोलवर आल्यानंतर गुन्हा

गुन्ह्यातील आरोपी योगेश गुरव हा कुख्यात शरद मोहोळ टोळीतील गुंड आहे. त्याला किशोर मारणेच्या खून प्रकरणात जन्मठेप झाली आहे. तो पॅरोलवर बाहेर आला आहे. ३० जुलै रोजी पॅरोल संपल्यानंतरी तो तुरुंगात गेला नाही. वाघुलकर याने त्याच्या मदतीनेच हा खुनाचा कट रचल्याचे समोर आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज