अ‍ॅपशहर

हुशार माणसांवर लोकांचा गाढ विश्वास

‘मैत्री अनेकांशी असते. राजकारणात बोट धरून आलो असे जे असे सांगतात ते काही खरे नसते. माणसं बोलायला हुशार असतात. त्यांच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतात आणि हे पुणेकरांनी सिद्ध केले आहे,’ या शब्दांत पुणे महापालिकेतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्मिक शब्दांत टिप्पणी केली.

Maharashtra Times 28 Feb 2017, 2:04 am
निवडणुकीनंतर प्रथमच पवारांची राजकीय कोपरखळी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune people believes on smart leader
हुशार माणसांवर लोकांचा गाढ विश्वास


म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘मैत्री अनेकांशी असते. राजकारणात बोट धरून आलो असे जे असे सांगतात ते काही खरे नसते. माणसं बोलायला हुशार असतात. त्यांच्या बोलण्यावर लोक विश्वास ठेवतात आणि हे पुणेकरांनी सिद्ध केले आहे,’ या शब्दांत पुणे महापालिकेतील दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्मिक शब्दांत टिप्पणी केली.
शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ गायिका डॉ. अनुराधा पौडवाल यांना राम कदम कलागौरव पुरस्कार प्रतिभा पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी सुधीर गाडगीळ यांनी पवार यांच्यासह प्रतिभा पवार, अनुराधा पौडवाल यांची मुलाखत घेतली. या वेळी व्यासपीठावर महापौर प्रशांत जगताप, ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, विजय राम कदम, फत्तेचंद रांका, संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स, प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया आदी उपस्थित होते. एक लाखांचा धनादेश, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते. या वेळी आदर्श कार्यकर्ता पुरस्कार नीलेश जेधे यांना प्रदान करण्यात आला.
‘राज्य आणि केंद्रामध्ये महाराष्ट्र वेगळे राज्य आहे. पुणे महापालिकेची नुकतीच निवडणूक झाली. त्या निवडणुकीच्या निकालानंतर आमचे अंकुश काकडे यांनी एका कट्ट्यावर विविध पक्षांतील मित्रांना चहा दिला. निवडणुका, राजकारणात संघर्ष हा व्यक्तिगत हिताचा असू नये. तो जनतेच्या हिताचा असावा,’ असा सल्ला पवार यांनी दिला. सार्वजनिक क्षेत्रात काम करताना ज्या कोणालाही भेटलो. त्यानंतर त्याचे नाव कम्प्युटरमध्ये लिहून ठेवायचे हे सूत्र मी पाळले. त्यामुळे दुसऱ्यांना सुखावह देणाऱ्या गोष्टी कराव्यात हे प्रत्येकाने लक्षात ठेवणे हितावह आहे, असे पवार म्हणाले.
पवार यांच्या मनात नेमके काय चालंलय हे प्रतिभा पवार यांना तरी कळंत का या प्रश्नावर श्रीमती पवार यांनी नाही असे स्पष्ट केले. पवार यांनी पत्नीच्या उत्तराचा धागा पकडून ‘गुगली बॉलरच्या मुलीशी आपण लग्न केले आहे. त्यावेळीदेखील आपली विकेट गेली होती. आता ही तिने नाही असे उत्तर देऊन आपली विकेट काढली,’ असे सांगताच सभागृहात हास्याचे कारंजे उडाले.‘'माझ्या पत्नीने नेसलेली प्रत्येक साडी मी स्वतः खरेदी केली आहे. त्यामुळे आठवड्यातील सहा दिवस मी हिंडायला मोकळा असतो,’ असे सांगताच सभागृहात पुन्हा खसखस पिकली.
दरम्यान, अनुराधा पौडवाल यांनी आपल्या वडिलांना नसलेली गायनाची आवड ते गायनाचा प्रवास उलगडला. प्रवीण तरडे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी पौडवाल यांनी काही चित्रपटांतील गाणी सादर केली.
.
पवारांच्या पुस्तकखरेदीचे रहस्य
‘'पुस्तकांच्या नोंदी कधी ठेवत नाही. पुस्तकातील एखादी ओळ आवडली की त्या खाली लाल रेघ ओढतो. पुस्तक निवडणे अवघड काम आहे. त्यासंदर्भात चांगले वाचक असेलल्या व्यक्तींशी आपण संवाद साधतो. महाराष्ट्रात शक्यतो पुस्तक खरेदीसाठी जात नाही. राज्याबाहेर कोठे गेलो तर एकटाच पुस्तकाच्या दुकानात जातो. तेथे नवी पुस्तके कोणती आली आहेत याची माहिती घेतो. त्यावेळी महाराष्ट्रातील काही पुस्तक विक्रेते नवीन आलेल्या पुस्तकांची आपल्याकडे यादी पाठवितात. त्या यादीतील हवी ती पुस्तके निवडतो आणि ऑफिसमधील व्यक्तींना आणायला सांगतो,’ या शब्दांत पवारांनी पुस्तकांच्या आवडीनिवडीचे रहस्य उलगडले. किशोरी आमोणकर, पं. भीमसेन जोशी आवडते गायक असल्याचे सांगून यशवंतराव चव्हाण यांची इंग्लंडच्या पंतप्रधानांची ओळख, लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे अफाट वाचन, ग. दि. माडगूळकर, ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकर, तसेच पी. सावळाराम यांची ठाण्याच्या संमेलनात झालेली निवड यासंदर्भातील विविध आठवणींना पवारांनी उजाळा दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज