अ‍ॅपशहर

कर थकबाकीदारांच्या यादीत पुणेकर ‘अव्वल’

व्यावसायिक वाहनांचा मोटार वाहन कर न भरलेल्या थकबाकीदारांच्या यादीत पुण्यातील वाहने सर्वाधिक आहेत. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत आठ लाख वाहनांचा वाहन कर थकलेला आहे.

Authored byकुलदीप जाधव | महाराष्ट्र टाइम्स 9 Nov 2020, 8:55 am
पुणे : व्यावसायिक वाहनांचा मोटार वाहन कर न भरलेल्या थकबाकीदारांच्या यादीत पुण्यातील वाहने सर्वाधिक आहेत. राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयाअंतर्गत आठ लाख वाहनांचा वाहन कर थकलेला आहे. त्यामध्ये पुणे आरटीओतील एक लाख नऊ हजार वाहनांचा समावेश आहे. कर थकबाकी आणि लॉकडाउनमुळे राज्याच्या परिवहन विभागाच्या महसुलात ३२ अब्ज रुपयांनी घट झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम कर थकबाकीदारांच्या यादीत पुणेकर ‘अव्वल’


राज्यात परिवहन आयुक्तालयाअंतर्गत ५० प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांतील नोंदणीनुसार राज्यातील एकूण वाहनसंख्या तीन कोटी ७८ लाख रुपये आहे. मात्र, 'परिवहन' प्रणालीतील अद्ययावत आकडेवारीनुसार दोन कोटी ८२ लाख वाहने 'अॅक्टिव्ह' आहेत. यामध्ये २५ लाख ११ हजार वाहने व्यावसायिक अर्थात प्रवासी, मालवाहतूक किंवा अन्य प्रकारातील आहेत. त्यापैकी १७ लाख सहा हजार ६४१ वाहनांनी आरटीओचा मोटार वाहन कर, पर्यावरण कर, रस्ता सुरक्षा अधिभार आणि नोंदणी शुल्क भरलेले आहे. तर, आठ लाख चार हजार ४०७ वाहनांनी सर्व प्रकारच्या कराचा भरणा केलेला नाही. त्यामध्ये पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक आणि कोल्हापूर या आरटीओतील कर थकबाकीदारांची संख्या राज्यात सर्वाधिक आहे. राज्यातील ५० पैकी १४ आरटीओत कर न भरलेल्या वाहनांची संख्या ही कर भरलेल्या वाहनांपेक्षी जास्त आहे. दरम्यान, कर थकबाकीदार वाहतूकदारांना राज्य सरकारने वार्षिक करात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२०पर्यंतचा थकीत कर ३१ डिसेंबरपर्यंत भरणाऱ्या वाहतूकदारांना चालू आर्थिक वर्षातील करात ५० टक्के सूट दिली जाणार आहे. या योजनेमुळे कर थकबाकी कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक व्यावसायिक वाहने पुण्यातच

राज्यातील २५ लाख ११ हजार वाहनांपैकी सर्वाधिक वाहनेदेखील पुणे प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आहेत. पुणे आरटीओत चार लाख १४ हजार ४१० वाहने, पिंपरी-चिंचवड कार्यालयाअंतर्गत एक लाख ८५ हजार १८ वाहने आणि बारामतीला २४ हजार २३६ एवढी वाहने आहेत. त्यामुळे थकबाकीदारांच्या पुणे सर्वोच्च स्थानी असले तरीही कर भरणाऱ्यांच्या यादीतही पुणेच शीर्षस्थानी आहे.

आर्थिक मंदीचा फटका?

करोना महामारीमुळे मार्च अखेरपासून देशभरात लॉकडाउन करण्यात आला. त्यानंतर प्रवासी वाहतुकीवर निर्बंध होते. कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची आणि शालेय विद्यार्थी वाहतूक बंद होती. तसेच, उद्योगधंदे बंद असल्याने मालवाहतूकही मोठ्या प्रमाणावर घटली होती. त्यामुळे वाहतूकदारांना अनेक महिने उत्पन्न मिळालेले नाही. परिणामी, वाहतूकदारांना आरटीओचा कर भरणे शक्य झाले नसल्याची शक्यता आहे.

सर्वाधिक कर थकबाकी असलेले पहिले पाच आरटीओ

(एक जानेवारी ते ६ नोव्हेंबर या कालावधीतील आकडेवारी)

आरटीओ कर भरलेली वाहने थकबाकीची वाहने

पुणे ३,०५,१४२ १,०९,२६८

ठाणे २,१२,५७० ८७,०४२

पिंपरी-चिंचवड १,२१,९३३ ६३,०८५

नाशिक ५८,५७० ४४,०९५

कोल्हापूर ३८,०२८ ४२,७०२

(स्रोत : परिवहन पोर्टल)

कर आणि शुल्क वसुलीतून परिवहन विभागाला प्राप्त महसूल

वर्ष महसूल

२०१६ ५४ अब्ज २० कोटी २९ लाख

२०१७ ८९ अब्ज ३० कोटी ९६ लाख

२०१८ २१९ अब्ज ९७ कोटी ५० लाख

२०१९ ७५ अब्ज ३६ कोटी दोन लाख

२०२० ४३ अब्ज ९४ लाख ६३ लाख (एक जानेवारी ते ६ नोव्हेंबर)

(स्रोत : परिवहन पोर्टल)
लेखकाबद्दल
कुलदीप जाधव
कुलदीप जाधव हे महाराष्ट्र टाइम्समध्ये वरिष्ठ बातमीदार म्हणून कार्यरत आहे. ते गेल्या १३ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. ते क्राइम, वाहतूक, बाजार समिती, जिल्हा परिषद, समाज कल्याण या विषयांसह विविध विषयांचे वार्तांकन करीत आहेत.... आणखी वाचा
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज